महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

अमित शाहांची शरद पवारांवर टीका, सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “हे ऐकून मला हसू…” - Supriya Sule

Supriya Sule on Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवारांना टभ्रष्टाचाराचे सरदार' म्हणत पुण्यात रविवारी जोरदार टीका केली होती. या टीकेला आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Supriya Sule Replied To Amit Shah Citicism On Sharad Pawar
शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 22, 2024, 11:05 AM IST

नवी दिल्ली/मुंबई- Supriya Sule on Amit Shah :भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सरदार कोणी असतील तर ते शरद पवार आहेत, अशी जहरी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (21 जुलै) पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात बोलताना केली होती. त्यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? : माध्यमांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "महाराष्ट्रात हेडलाईन करायची असेल तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. एका सशक्त लोकशाहीमध्ये आमच्या विरोधकांनाही टीका करायचा अधिकार आहे. अरे विरोधकही दिलदार असला पाहिजे. तसंच आम्ही लोकशाही वाले लोक आहोत, दडपशाही वाले नाही." पुढं त्या म्हणाल्या, "अमित शाह यांची टीका ऐकून मला हसू आलं.

90 टक्के लोक आज वॉशिंग मशीनमुळं भाजपात-"अमित शाह यांना मी आठवण करून देऊ इच्छिते की, त्यांच्याच मोदी सरकारनं पद्मविभूषण पुरस्कारानं शरद पवारांना सन्मानित केलंय. ज्या लोकांवर भाजपानं भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते आता अमित शाहांच्या भाजपाचे राज्याचे मंत्री आणि पदाधिकारी आहेत. आमच्या सोबत काम केलेले अशोक चव्हाण हे तर मंचावर अमित शाहांच्या मागे बसलेले दिसले. त्यांच्यावर याच भाजपानं भ्रष्टाचाराचे कितीतरी आरोप केले होते. त्यामुळं भाजपानं भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्यांपैकी 90 टक्के लोक आज वॉशिंग मशीनमुळं भाजपात आहेत."

काय म्हणाले होते अमित शाह? : पुण्यात रविवारी (21 जुलै) भाजपानं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन आयोजित केलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी अमित शाह यांनी "शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरगना (सरदार) आहेत," अशी खोचक टीका केली होती. तसंच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, "शरद पवार यांनी राज्यात भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्या आहेत. आम्ही 2014 मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं. सरकार कुणाचं आलं आरक्षण गेलं? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आलं. त्यामुळं आरक्षणासाठी भाजपाचं सरकार यायला हवं. त्यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येतं, तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळतं. शरद पवारांची सत्ता आल्यानंतर आरक्षण जातं," अशी टीका अमित शाहांनी केली.

हेही वाचा -

  1. "शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार, त्यांचं सरकार येताच आरक्षण..."; पुण्यातून अमित शाहांचं शरसंधान - Amit Shah on Sharad Pawar
  2. झालं गेलं विसरुन जायला तयार पण...., शरद पवारांची स्पष्टोक्ती - MP Sharad Pawar
  3. "आयएएस अधिकारी पूजा खेडकर..." ; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी - Pooja Khedkar Case

ABOUT THE AUTHOR

...view details