मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असून, तब्बल 230 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. त्यांना केवळ 46 जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळं विरोधी पक्षनेतेपद मिळणं सुद्धा कठीण झालंय. या निकालानंतर खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर शिवसेना आमदारांच्या झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. उदय सामंत यांनी मांडलेल्या ठरावाला सर्व आमदारांनी संमती दिली. यावेळी एकनाथ शिंदेंनी सर्व आमदारांचा सत्कारही केला.
एकनाथ शिंदे - नारायण राणे भेट : शिवसेनेला तब्बल 57 जागा मिळाल्या असून, याचं श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जात असल्याचं शिवसेनेतील नेते सांगत आहेत. त्यामुळं मुख्यमंत्री शिंदे यांचं अभिनंदन करण्यासाठी शिवसेनेचे तसंच इतर पक्षातले नेते हे 'वर्षा' तसंच ठाण्यातील शिंदे यांच्या निवासस्थानी गर्दी करत आहेत. भाजपा खासदार नारायण राणे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
खरी शिवसेना शिंदेंचीच : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेत फूट पाडली. तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेते हे 'खोटी शिवसेना' असं म्हणत वारंवार मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करत आहेत. पक्ष आणि चिन्ह चोरलं, असं म्हणत उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी नेहमी शिंदेंवर टीका केली. आता निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर खरी शिवसेना कोणाची? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. या प्रश्नाला खासदार नारायण राणे यांनी उत्तर दिलं. "खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे हे जनतेनं आता सिद्ध केलं आहे," असं राणे म्हणाले.
हेही वाचा -