सिंधुदुर्ग : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. एका कार्यक्रमासाठी नितीन गडकरी हे सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले. ते स्टेजवर बोलत असतानाच त्यांच्या सुरक्षेसाठी तनात असलेल्या कमांडोला भोवळ आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असताना हा प्रकार घडला. त्यानंतर त्या कमांडोला तत्काळ स्टेजवरुन उचलून बाजूला नेण्यात आलं. मात्र, नितीन गडकरी यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं.
आप्पासाहेब गोगटे याचं काम : राजकारण केवळ सत्ताकारण नसून समाजकारण आहे. विकास हाच खरा हेतू असायला हवा. गरीबांचे अश्रू पुसणे, शेतकरी आणि शेतमजुरांचे कल्याण करणे, गावात चांगल्या शाळा आणि उत्तम रस्ते उपलब्ध करून देणे, शुद्ध पाणी मिळवून देणे हे प्राथमिक उद्दिष्ट हवे. जाती, धर्म, भाषा याच्या पलिकडं विचार करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कामं केली पाहिजेत. हा दृष्टिकोन ठेवून आप्पासाहेब गोगटे यांनी काम केलं आप्पासाहेबांसारखे दैव दुर्लभ नेतृत्व अभावानेच जन्माला येतं अशा शब्दात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देवगडचे माजी आमदार दिवंगत आप्पासाहेब गोगटे यांचा गौरव केला.
जन्मशताब्दी वर्षाचा समारोप : दिवंगत आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे बंदर विकास व मत्स्य विकास मंत्री नितेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, प्रकाश गोगटे, माजी आमदार डॉ. विनय नातू, वकील संग्राम देसाई, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, श्वेता कोरगावकर, स्नेहलता देशपांडे, काका ओगले, अश्विनी भावे, शामकांत काणेकर, नकुल पार्सेकर, संदीप साटम, बाळ खडपे, सुधीर जोशी, सदा ओगले, वैभव बिडये उपस्थित होते.
गडकरी यांनी सांगितली आठवण : गडकरी म्हणाले की, जातपात धर्म विसरून केवळ माणुसकी म्हणून काम करण्याचा आप्पासाहेब गोगटे यांचा स्वभाव होता. भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या नावामागे कधीही "यादव" लावले नाही, तसंच परशुरामांनी "शर्मा" लावले नाही. त्यामुळं आपणही जातीपातीच्या पलीकडं विचार केला पाहिजे. समाजाच्या उन्नतीसाठी माणूस ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन यांचा उपयोग करून पुढे जायला हवा. असं सांगत आपल्या आयुष्यात आलेला प्रसंग सांगितला, "मी आणि माझी पत्नी बुध्दाचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी भगवान गौतम बुद्धांचं दर्शन घेतलं आणि बोधी वृक्षाखाली उभे होते. वटवृक्षाचे पान माझ्या खांद्यावर पडले. तेव्हा उपस्थित बौद्ध भिकूंनी सांगितलं की, हे भगवान बुद्धांचे आशीर्वाद आहेत. अशा प्रसंगातून आपण समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेतली जाते, याचा आनंद होतो." अशी आठवण गडकरी यांनी सांगितली. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी आप्पासाहेब यांच्या आठवणी सांगितल्या.
हेही वाचा -