अमरावती : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप करून जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. सुनील खराटे हे बडनेरा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात होते. जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी आपल्या प्रचाराकडे पाठ फिरवल्याचा आरोप सुनील खराटे यांनी केला आहे.
काँग्रेस नेत्यांना अनेकदा दिलं निमंत्रण : "प्रचारसभा, पदयात्रा, बैठक यासाठी यशोमती ठाकूर आणि काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांना वेळोवेळी निमंत्रण देण्यात आली. परंतु कुठल्याही प्रचारास उपस्थित न राहता त्यांनी मी रिंगणात असलेल्या एका बंडखोर अपक्ष उमेदवार आर्थिक रसद पुरवित अप्रत्यक्षपणे त्यांचा प्रचार केला. तो उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. प्रचारासाठी येणं होत नसेल, तर किमान सोशल मीडियावर आवाहन करणारी एक दोन मिनिटांची बाईट द्यावी अशी विनंती यशोमती ठाकूर यांना केली असता त्यासाठी देखील त्यांना सवड नसल्याचं सांगितलं," असा गंभीर आरोप सुनील खराटे यांनी केला.
काँग्रेससोबत युती नकोच : जिल्ह्याची जबाबदारी घेतलेल्या यशोमती ठाकूर यांनी माझ्याच नव्हे, तर अन्य मतदारसंघात देखील जाणं सोयीस्करपणे टाळत आघाडीचा धर्म पाळला नसल्याचं सांगत त्याचे परिणाम संपूर्ण जिल्ह्याला भोगावे लागत असल्याची खंत खराटे यांनी व्यक्त केली. या सर्व प्रकारासंदर्भात आपण शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बोलणार असून काँग्रेससोबत युती तोडा, असं वरिष्ठांना सांगणार असल्याचं सुनील खराटे यांनी म्हटलं.
खासदार झाले बिझी : "अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांना निवडून आणण्यामध्ये शिवसेनेनं महत्त्वाची भूमिका बजावली. लोकसभा निवडणुकीत कुणाच्याही निमंत्रणाची वाट न बघता आघाडीचा धर्म पाळत शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणं काम केलं. असं असताना खासदार बळवंत वानखडे यांनी दोन-तीन वेळा प्रचार सभा व पदयात्रेसाठी स्वतःहून वेळ दिली. पण त्यांना सवड मिळाली नाही. सोशल मीडियावर बाईट देण्याची विनंती केली, असता ती सुद्धा जाणीव पूर्वक टाळली. विशेष म्हणजे शिवसेना व काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना अपक्ष बंडखोर उमेदवाराचं काम करा, अशी विनंती देखील खासदारांनी केल्याची माहिती आहे. आपले लोकप्रिय खासदार खूप बिझी झाले," असा टोला सुनील खराटे यांनी एका निवेदनाद्वारे लगावला.
दुसऱ्यासाठी खड्डा खोडणारे पडले खड्ड्यात : 'जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो, तोच त्या खड्ड्यात पडतो' या म्हणीची प्रचिती निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आल्याचं सुनील खराटे यांनी म्हटलं. "आपल्या विरोधात उभ्या असलेल्या बंडखोर उमेदवारास मदत करीत यशोमती ठाकूर यांनी माझा पराभव व्हावा, यासाठी खड्डा खोदला. पण त्या खड्ड्यात त्या स्वतः पडल्या असं सांगून 'जैसे ज्याचे कर्म ,तैसे फळ देतो ईश्वर'," असा हल्लाबोल सुनील खराटे यांनी केला.
हेही वाचा