मुंबई - महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? यावरून सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आज मुख्यमंत्रिपदाबाबत महायुतीची महत्त्वाची बैठक होणार आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "संख्याबळ इतके मोठे आहे की ते कोणालाही मुख्यमंत्री म्हणून पाठवू शकतात. नरेंद्र मोदी आणि अमित शाह मुख्यमंत्री ठरवतील," असंही खासदार संजय राऊत म्हणालेत.
पुढचा मुख्यमंत्री कोण? : याबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "पुढचा मुख्यमंत्री कोण? हा निर्णय दिल्लीतून होणार आहे. खऱ्या अर्थाने हा निर्णय महाराष्ट्रातच व्हायला पाहिजे. आम्ही पथ्य आणि परंपरा पाळलीय. मोदी आणि अमित शाह हे मुख्यमंत्री दिल्लीतून ठरवणार आहेत. ते आज किंवा उद्या नावं जाहीर करतील. त्यांना बहुमतासाठी हात पसरावे लागणार नाहीत. दिल्लीतून जो मुख्यमंत्री ठरवतील तो स्वीकारावा लागेल. यांचा मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला काय असेल यावर मी बोलणार नाही. मात्र, शब्द पाळण्याची भारतीय जनता पक्षाची परंपरा नाही. आता कदाचित त्यांना महाराष्ट्राशी वैर घ्यायचं असल्यामुळे ते अशी कोणतीही भूमिका घेऊ शकतात."
अपयशाची कारणे शोधली पाहिजेत: या निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावं लागलंय. त्या पराभवाला नाना पटोले जबाबदार असल्याचं म्हटलं जातंय. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "एका व्यक्तीवरती पराभवाचे खापर फोडता येत नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. शरद पवार यांच्या सारखे नेते ज्यांच्या मागे महाराष्ट्र उभा होता त्यांनादेखील अपयश आले. अपयशाची कारणे शोधली पाहिजेत. ती कारणे ईव्हीएम मशीनमध्ये आहेत. यंत्रणेच्या गैर वापरामध्ये आहेत. घटनाबाह्य कृत्यामध्ये आहेत आणि चंद्रचूड यांनी न घेतलेल्या निर्णयामुळे आहेत."
EVM विरोधातील 450 तक्रारी आमच्याकडे : पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "मुख्य कारणं शोधावी लागतील. हे महाविकास आघाडीचे अपयश आहे. व्यक्तिगत एका पक्षाचा पराभव आहे, असे मी मानायला तयार नाही. ठाण्यातून evm मशीन संभाजी नगरला घेऊन जाऊन परत ठाण्यात फिडिंग करून आणलंय आणि ते पुराव्यानिशी समोर आलंय. असे कोणते महान क्रांतिकारक काम केले की, त्यांना लाखो मतं पडली? EVM विरोधातील 450 तक्रारी आमच्याकडे आल्यात. त्यांची दखल घेतली नाही. माझी पुन्हा मागणी आहे की, हा निकाल तसाच ठेवा आणि पुन्हा निवडणूक पोस्टल बॅलेट पेपरवरती घ्या आणि मग निकाल पाहा," असंही संजय राऊत म्हणालेत.
आम्ही रडीचा डाव खेळत नाही: "आम्ही महाविकास आघाडी पोस्टल बॅलेट मतदानात आघाडीवर होतो. तो त्या त्या भागातील कल आणि ट्रेंड आहे. आम्ही रडीचा डाव खेळत नाही. आम्ही हरलो म्हणून बोलतो, असं नाही. गेली 10 वर्षे आम्ही सांगतोय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. मग ते म्हणतील झारखंडला तुम्ही जिंकलात ना? मग असं करा, महाराष्ट्र आम्ही जिंकतो एकदा. फोडा तोडा आणि राज्य करा हेच सुरू आहे. पैशाच्या जीवावर निवडणुका जिंकत आहेत," अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिलीय.
हेही वाचा-