पुणे : गेल्या काही वर्षात कुस्ती क्षेत्रामध्ये वाद निर्माण झाले असून दोन संघटना झाल्यानं दोन वर्षापासून दोन्ही संघटनांकडून वेगवेगळ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्यात येत आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघ यांच्यात वाद सुरू आहे. याबाबत न्यायालयीन लढाई देखील सुरू आहे. असं असताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून येत्या 26 ते 30 मार्चला कर्जत जामखेड इथं 66 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.
कर्जत जामखेडला रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी याबाबत घोषणा केली. नुकतंच कुस्तीगीर संघाच्या वतीनं अहिल्यानगर इथं झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ झाला. त्यानंतर आता कर्जत जामखेड इथं आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. यामुळे आता यावर्षी दोन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होताना पाहायला मिळणार आहेत.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत राजकारण बाजुला ठेवणार : यावेळी रोहित पवार म्हणाले की, "महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं या 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा 26 ते 30 मार्च 2025 दरम्यान दादा पाटील महाविद्यालय कर्जत इथं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. कर्जत जामखेडचा प्रतिनिधी म्हणून मी या पत्रकार परिषदेस आलो आहे. महारष्ट्र कुस्तीगीर परिषद 1953 ला सुरू झाली. अनेक मान्यवरांनी कुस्तीसाठी खूप काही केलं आहे. गेले 70 वर्ष ही परिषद कुस्तीसाठी काम करत आलेली आहे. आपण पाहिलं तर काही दिवसापूर्वी अहिल्यानगरमध्ये दोन वर्षापूर्वी स्थापन झालेल्या महासंघानं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेतली. या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राजकारण झालं हे सगळं आपण पाहिलेलं आहे. पण आम्ही राजकारण बाजूला ठेवून ही स्पर्धा घेणार आहोत. महारष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जर राजकारण झालं, तर यात अनेक जणांचं नुकसान होऊ शकते, असं यावेळी रोहित पवार म्हणाले.
कोण कोण राहणार उपस्थित ? : संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र पादुका कर्जत जामखेडमध्ये येणार आहेत, हा योगायोग आहे. दोन वर्षापूर्वी सुरू झालेला महासंघ कुस्तीत राजकारण करत आहे. महासंघ स्थापन होऊन दोन वर्ष झाली, परिषद एवढ्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेत आहे. आम्ही पैलवानांसाठी ही स्पर्धा घेत आहोत. त्यामुळे मोहोळ, राक्षे आणि गायकवाड यांना बोलवणार आहोत. तसेच आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय क्रीडामंत्री यांना बोलावणार आहे. शेवटच्या दिवशी शरद पवार हे देखील उपस्थितीत राहणार आहेत, असं यावेळी रोहित पवार म्हणाले.
मॅट आणि माती दोन्ही स्पर्धा : यावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे म्हणाले की, आपण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती स्पर्धा सुरू केल्या आहेl. मॅट आणि माती दोन्ही स्पर्धा सुरू केल्या असून नुसतं महाराष्ट्र केसरी होऊन काही नाही चालणार. आम्ही वाद होणार नाही याचा प्रयत्न करतो. वाद झाला तर ते पंच सोडवतात. आता झालेल्या महाराष्ट्र केसरी बद्दल बोलत नाही. आम्ही सर्व गटात स्पर्धा घेतो, कोणत्याही खेळाडूवर बंदी आणणं हे चुकीचं आहे. खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे. आमच्या संघटनेला राज्य तसेच केंद्राची मान्यता आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :