मुंबई Lok Sabha Election 2024 : देशभरात आज 18व्या लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्याचवेळी 20 मे रोजी होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालीय. पाचव्या टप्प्यासाठी देशातील 8 राज्यात एकूण 49 जागांसाठी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यात 13 जागांसाठी मतदान होत असून यामध्ये महामुंबईतील 10 जागांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यात मतदानासाठी 20 मे रोजी होणारा पाचवा टप्पा हा अंतिम टप्पा आहे. तर निकाल 4 जून रोजी लागणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त 5 दिवस : देशभरासह महाराष्ट्र राज्यात पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होत आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आज 26 एप्रिल पासून सुरू झाली असून 3 मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दाखल केलेल्या अर्जाची छाननी 4 मे रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 6 मे आहे. या आठवड्यामध्ये तीन सुट्ट्या आल्यानं उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता उमेदवारांना फक्त 5 दिवस उपलब्ध आहेत. 27 व 28 एप्रिल रोजी शनिवार व रविवार असल्यानं शासकीय कार्यालयांना सुट्टी आहे. तर 1 मे बुधवार रोजी महाराष्ट्र दिन असल्यामुळं त्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत. या कारणानं उमेदवारांना आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त 5 दिवस भेटत आहेत.
महामुंबईतील 10 लोकसभा मतदारसंघ : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, ठाणे, भिवंडी, कल्याण, पालघर या मतदारसंघात मतदान होणार आहे. तसंच नाशिक, दिंडोरी, धुळे या मतदारसंघातही मतदान होणार आहे.
असा आहे पाचव्या टप्प्यातील निवडणुकीचा कार्यक्रम :
- अर्ज दाखल करण्याचा अवधी : 26 एप्रिल ते 3 मे 2024
- अर्जाची छाननी : 4 मे 2024
- अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : 6 मे 2024
- मतदान : 20 मे 2024
- मतमोजणी : 4 जून 2024