ठाणे :गेल्या अडीच वर्षात राज्याच्या राजकारणात खिचडी झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक नवनवीन घोषणा करून लोकांना प्रभावित करत आहेत. मात्र, लोक त्यांच्या अडीच वर्षाच्या राजकारणाला विसरले नाहीत. यामुळं यंदा राज्यातील मतदार राज ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त करत असल्यानं विधानसभेत मनसे डबल आकडी संख्या गाठणार आहे. तो आकडा ९९ आमदारांचाही असू शकतो, असा दावा मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी केल्यान निवडणुकीच्या मैदानात खळबळ उडवून दिली. तर दुसरीकडं २४ ऑक्टोंबर रोजी राजू पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः राज ठाकरे उपस्थित राहणार असल्यानं या मतदारसंघात पुन्हा चुरशीची लढत होणार आहे.
प्रतिक्रिया देताना आमदार राजू पाटील (ETV Bharat Reporter) अविनाश जाधव आणि राजू पाटील यांना उमेदवारी : राज्यात सत्तासंघर्षानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची खरी रणधुमाळी आजपासून सुरू झाली. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यात दौरे करून 'एकला चलोचा नारा' देत, इच्छुक मनसौनिकांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. दुसरीकडं राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आमदार राजू पाटील यांच्यासह ठाण्यातून मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव या दोघांची उमेदवारी जाहीर केली.
मनसे, ठाकरे गट आमने-सामने, शिंदे सेनाही रणांगणात? : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकमेव उमेदवार निवडून देणारा मतदारसंघ म्हणून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांना या मतदारसंघातून पुन्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संधी दिली आहे. गेल्या निवडणुकीत माघार घेणारे माजी आमदार सुभाष भोईर हे यावेळी मात्र शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर दुसरीकडं शिंदे गटाच्या दोन-तीन इच्छुकांनी देखील या मतदारसंघावर दावा केल्यानं चुरशीच्या ठरणाऱ्या या तिरंगी लढतीकडं नजरा लागल्या आहेत. एकंदरीतच या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.
राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यात अनेकदा खटके : 2019 मध्ये कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे यांचा पराभव करत, मनसेचे राजू पाटील हे निवडून आले होते. त्यावेळी विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना उमेदवारी नाकारून शिवसेनेकडून रमेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मनसेचे नेते राजू पाटील यांनी रमेश म्हात्रे यांना पराभूत केलं होतं. मध्यंतरीच्या काळात मनसे आमदार राजू पाटील आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यात अनेकदा खटके उडाल्याचं देखील पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्यामुळं राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघात डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली होती. लोकसभा निवडणुकीत राजू पाटील यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांचा प्रचार केला होता.
शिवसेना मनसेला मदत करेल? : कल्याण ग्रामीणमधून शिवसेना शिंदे गटातून राजेश मोरे आणि रमाकांत मढवी ही नावे चर्चेत आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत राजू पाटील यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांना केलेली मदत पाहता या मतदारसंघात शिवसेना मनसेला मदत करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मदतीच्या परतफेडीची मनसेला अपेक्षा : कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे यंदा विजयी झाले. डॉ. शिंदे यांच्या विजयामध्ये मनसे आमदार राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघाने सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळंच डॉ. शिंदे यांना कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून भरघोस मते मिळाली. त्यावेळी शिवसेनेकडून मनसेला विधानसभेत सहकार्य करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, असं बोललं जातंय. या आश्वासनानंतर खासदार डॉ. शिंदे यांच्या प्रचारात राजू पाटील यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळं या मदतीची परतफेड शिवसेना आणि डॉ. शिंदे यांच्याकडून होईल, अशी मनसेला अपेक्षा आहे.
मतदार कुणाच्या बाजूनं कौल देणार? : कल्याण, डोंबिवली, ठाणे महापालिकेतील काही भाग, कल्याण तालुका, अंबरनाथ तालुक्यातील काही भाग, नवी मुंबईतील गावे तसेच कल्याण पूर्वेतील लोकग्राम परिसर अशा विस्तृत परिसरात कल्याण ग्रामीण मतदारसंघाचा विस्तार आहे. या मतदारसंघावर आगरी मतदारांचे प्राबल्य असल्यानं सर्वच राजकीय पक्षाकडून या मतदाराच्या मतांचे दान मिळविण्यासाठी आगरी चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र काहीही असलं तरी यावेळी या मतदारसंघातून दिग्गजांनी निवडणूक लढविण्याची तयारी केल्यानं या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. यापूर्वी याच मतदारसंघाने दोनदा मनसेच्या बाजूनं कौल दिला होता. त्यामुळं यावेळच्या निवडणुकीत मतदार कुणाच्या बाजूनं कौल देतात याकडं जिल्ह्यातील सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
...तर शिवसेनेत मतांची विभागणी : शिवसेनेकडून डोंबिवलीचे शहरप्रमुख राजेश मोरे, ठाणे महापालिकेचे उपमहापौर रमाकांत मढवी आणि कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील यांच्यात उमेदवारी मिळविण्यासाठी चुरस वाढली आहे. मात्र, महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिंदे गटाला सुटल्यास ठाकरे गटाच्या उमेदवाराला शह देण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मतांमध्ये विभाजन करण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत सुभाष भोईर यांना उमेदवारीपासून दूर ठेवले होते. मात्र, शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर भोईर उमेदवारीचे प्रमुख दावेदार झाले आहेत. मतदारसंघात असलेला दांडगा जनसंपर्क आणि मित्र पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या मताची जोड त्यांना मिळणार असल्यानं महाविकास आघाडीचे आव्हान असणार आहे.
हेही वाचा -
- राष्ट्रवादी, शिवसेना फुटीनंतर विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्याचं समीकरण बदलणार
- विधानसभा निवडणूक 2024 : 'या' विधानसभा मतदार संघातून प्रशांत गोळेंना वंचितकडून उमेदवारी
- "आमचे सरकार आल्यानंतर विकासकामांच्या बोगस टेंडरची चौकशी करणार"- पृथ्वीराज चव्हाणांचा इशारा