वाशिम : विधानसभा निवडणूक 2024 साठी राजकीय हालचालींना वेग आलाय. अनेक दिग्गज नेत्यांनी मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. अशातच महायुतीचे स्टार प्रचारक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विदर्भ दौऱ्यावर असून आज ते वाशिम येथे भाजपाचे उमेदवार श्याम खोडे यांच्या प्रचारार्थ आले होते. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
मोदींच्या नेतृत्वात थेट सजिर्कल स्ट्राईक : योगी आदित्यनाथ यांनी भाषणाची सुरुवात 'भारत माता की जय'च्या घोषणेनं केली. त्यांच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारंवार उल्लेख झाला. सभेला संबोधित करताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, "1947 मध्ये देश स्वतंत्र झाला. तेव्हापासून काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसच्या काळात देशात अतिरेकी हल्ले होत होते. तेव्हा पाकिस्तान घुसखोरी करत बॉम्बस्फोट करत होते. चीन सिमा ओलांडून देशात घुसखोरी करायचे. परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यामुळं परिस्थिती बदललीय. मोदींच्या नेतृत्वात आता थेट सजिर्कल स्ट्राईक होतं. मोदींमुळं आता चीन देखील देशात घुसखोरी करत नाहीत."