मुंबई : महायुतीनं जागावाटपात आघाडी घेतली असली तरी सुद्धा अद्याप काही जागांचा तिढा कायम आहे. यासाठी आज (24 ऑक्टोबर) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवारीच (23 ऑक्टोबर) दिल्लीत दाखल झाले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीत पोहोचतील. या बैठकीत जागा वाटपाचा तिढा सोडवला जाणार असून महायुतीची जागावाटपा संदर्भातील ही अंतिम बैठक असल्याचं सांगितलं जातय.
उर्वरित जागांचा तिढा आज सुटणार : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना महायुतीत काही जागांचा तिढा अद्यापही कायम आहे. या अगोदर भाजपानं 99, शिवसेना एकनाथ शिंदे गटानं 45, तर अजित पवार गटानं 38 जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. एकूण 288 जागांपैकी आतापर्यंत महायुतीकडून 182 जागांची घोषणा करण्यात आली आहे. उर्वरित 106 जागांपैकी जवळपास बहुतांश जागांवर एकमत झालं असून काही जागांवर मतभेद आहेत. यापैकी अनेक जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केलाय. त्यामुळं हा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार आहे. अमित शाह यांनी यापूर्वीच तिन्ही पक्षांच्या नेत्यांना आपापसात जितक्या जागांचा प्रश्न सोडवता येईल त्या त्यांनी सोडवाव्यात त्यानंतर उरलेल्या जागा संदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी असं सांगून ठेवलं होतं. त्या अनुषंगानं आज दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.