अमरावती : मोर्शी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी झाली होती. येथे राष्ट्रवादीनं आपला उमेदवार दिलाय. "या मतदारसंघात आम्ही भाजपाचा उमेदवार दिला. मोर्शी विधानसभा मतदारसंघात आम्हाला केवळ कमळ हवं, घड्याळ अजिबात नको," असं देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं. मोर्शी विधानसभा मतदारसंघात वरुड येथं भाजपाचे उमेदवार उमेश उर्फ चंद्रकांत यावलकर यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेला अमित शाह यांनी संबोधित केलं.
घड्याळ नको, कमळ आणा : राज्यात महायुती एकत्र निवडणुका लढत आहे. तर मोर्शी या मतदारसंघात भाजपाकडून उमेश यावलकर तर राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार देवेंद्र भुयार हे रिंगणात आहेत. त्यामुळं येथे महायुतीत बिघाडी झाल्याचं दिसत आहे. दरम्यान, भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी मोर्शीत अमित शाह दाखल झाले होते. यावेळी त्यांनी महायुतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचं घड्याळ नको म्हणत भाजपाचं कमळ आणायचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं.
प्रचार सभेत बोलताना अमित शाह (Source - ETV Bharat Reporter) विजय मिरवणुकीसाठी मोर्शीत येणार : "आज आम्ही आमचा जाहीरनामा मुंबईत जाहीर केला. यामुळं मोर्शी विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेसाठी येण्यास उशीर झाला. आज मी फारसं बोलणार नाही. मोर्शी विधानसभा मतदारसंघासह अचलपूर आणि तिवसा विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, असं आवाहन मी सगळ्यांना करतो. आज मी वेळ देऊ शकत नाही, यामुळं मला माफ करा. मात्र, मोर्शी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार उमेश यावलकर निवडून आले की, विजयी मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी नक्की येईन," असं आश्वासन अमित शाह यांनी दिलं.
पाच मिनिटांत उरकलं भाषण : मोर्शी विधानसभा मतदारसंघात वरुड येथे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आली. जाहीर सभेसाठी अमित शाह यांचं हेलिकॉप्टर चार वाजून पंधरा मिनिटांनी हेलीपॅडवर उतरलं. अमित शाह हे सभा मंचावर चार वाजून पंचवीस मिनिटांनी आले. मंचावर चढताच त्यांनी तत्काळ माईक हाती घेतला आणि अवघ्या पाच मिनिटात आपलं भाषण उरकलं. या पाच मिनिटांच्या भाषणात त्यांनी "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे म्हणतात ते निश्चितपणे करतात, हा विश्वास आता सर्वांना पटला. आता लवकरच वक्फ मंडळ बरखास्तीचा निर्णय देखील होईल," असं अमित शाह म्हणाले. खासदार अनिल बोंडे, माजी खासदार रामदास तडस यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा
- उद्धव ठाकरे, तुम्ही कुठे बसलात याची आठवण करून देतो..अमित शाह यांचा हल्लाबोल
- ऐन प्रचारावेळी आमदाराच्या मुलाचं अपहरण; नग्न व्हिडिओ काढल्याचा आरोप
- वरळीकर माझ्या बाजूने कौल देतील, आदित्य ठाकरे यांना विश्वास