नांदेड- शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत असून, वर्धा ते गोवा असा हा महामार्ग होणार आहे. या महामार्गामध्ये 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत. महामार्गामुळे शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नसल्यानं महामार्गाला शेतकरी विरोध करीत आहेत. नांदेडमधूनदेखील हा महामार्ग जात असून, या महामार्गाला नांदेड जिल्ह्यातील शेतकरीसुद्धा विरोध करीत आहेत. त्यानंतर आता या प्रकरणात भाजपा नेते अशोक चव्हाण यांनी भाष्य केलंय. शक्तिपीठ महामार्गाला पूर्वीही विरोध झाला होता आणि आता ही माझा विरोध आहे. मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांना भेटून यातून पर्यायी मार्ग काढता येईल का हे पाहावे लागणार असल्याचं मत भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलंय. दरम्यान, नांदेडचा बीड होऊ द्याचा नसेल तर मुंडे बंधू आणि भगिनींना नांदेडचे पालकमंत्री पद देऊ नये, अशी भूमिका मराठा समन्वयकाने घेतलीय. त्यावर खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं की, मागण्या अनेक होत असतात, लोकांची मतंही असतात, शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्री जो ठरवतील तोच नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री होईल, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिलीय. अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय.
शेतकऱ्यांचा तीव्र स्वरूपात विरोध : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या मतदारसंघातून शक्तिपीठ महामार्ग जातोय. तिथल्या शेतकऱ्यांनी त्याला तीव्र स्वरूपात विरोध दर्शवलाय. मतांसाठी खोटी आश्वासन भाजपाने दिली असून, शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केलाय. शेतीच्या दहापट मोबदला दिला तरी जमीन देणार नाही, जमीन घ्यायचा प्रयत्न केला तर तीव्र विरोध करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी फडणवीस सरकारला दिलाय. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना विरोध पाहता तत्कालीन शिंदेंच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने महामार्ग करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. शक्तीपीठ महामार्ग यापुढे करणार नाही आणि याला स्थगिती देतो, परंतु जशा निवडणुका पार पडल्या, त्यानंतर पुन्हा एकदा महायुती सरकारनं शक्तिपीठ महामार्ग करण्याच्या हालचालींना वेग दिलाय.
गोव्यामध्ये एक देवी : खरंतर शक्तिपीठ महामार्ग धार्मिक अन् भावनिक लोकांना जोडण्यासाठी तयार केला जात असल्याचं बोललं जातंय. वास्तविक गोव्यामध्ये एक देवी आहे, मराठवाड्यातील लोक त्या देवीला जातात. या रस्त्याच्या माध्यमातून शक्तीपीठ नसून हा एक कमिशन पीठ सुरू आहे. या रस्त्याच्या माध्यमातून प्रचंड कमिशन या राज्यकर्त्यांना जमा करायचा आहे. निवडणुकीत झालेला खर्च या नव्या रस्त्याच्या माध्यमातून काढायचेय, त्यासाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले जात असल्याचंही स्थानिक शेतकऱ्यांनी म्हटलंय. शक्तिपीठ महामार्गाला रद्द करण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन सुरू करणार आहोत. जसा कोल्हापूरमध्ये विरोध आहे, तसाच किंबहुना त्यापेक्षा मोठा विरोध नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलाय. शेतकऱ्यांच्या मदतीनं काँग्रेस पक्षदेखील मैदानात उतरणार असून, शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून हा लढा तीव्रपणे लढू, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते तिरुपती कोंडेकर यांनी दिलीय.
शेतकऱ्यांचा नेमका विरोध का? : "आम्हाला गोव्याला दारू प्यायला जायचे नाही " अशा शब्दात शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय. शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित रस्त्यात नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील काही गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. अर्धापूर तालुक्यातील जमीन ही बागायती आहे. भरघोस उत्पादन इथले शेतकरी घेत असतात. केळीचे तसेच सोयाबीन, हळद पिकाच्या मोठ्या बागा या भागात पाहायला मिळतात. त्यामुळे येथील जमीन कसदार असून, अधिक उत्पन्न देणारी जमीन आहे. त्यामुळेच जमिनी देणार नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय.
हेही वाचा..