पुणे Loksabha Election 2024 MNS Candidates : पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर सोपवली होती. अमित ठाकरे हे पुणे लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून काम बघत आहेत. असं असतानाच आता पुण्यातून मनसेतर्फे लोकसभा निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांची नावं राज ठाकरे यांना कळविण्यात आली आहेत. यामध्ये वसंत मोरे, साईनाथ बाबर, बाबू वागसकर, किशोर शिंदे, गणेश सातपुते यांच्या नावांचा समावेश आहे. यावरच आता मनसे नेते वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली असून पुणे लोकसभेसाठी पक्ष त्यांचीच निवड करणार असा दावाही त्यांनी केला आहे.
काय म्हणाले वसंत मोरे :प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना वसंत मोरे म्हणाले की, "सर्वांचे एकमत होऊन माझ्या नावावर सहमती व्हायला हवी. स्वतः वहिनी (शर्मिला ठाकरे) सुद्धा वसंत तुला लोकसभेत पाहायचं आहे असं म्हणाल्या आहेत. मी पहिल्या दिवसापासून लोकसभेवर दावा करत असल्यानं लोकसभेची 100% उमेदवारी मनसे कडून मलाच मिळणार", असा दावा मोरे यांनी केला. तसंच मनसेकडं पुणेकर खूप आशेनं पाहत आहेत. "माझं जर काम बघितलं तर तर सर्व उमेदवारांपेक्षा मी सातत्यानं चांगलं काम करतोय. त्यामुळं मलाच उमेदवारी मिळणार."