वॉशिंग्टन/नवी दिल्ली- अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी मतदान यंत्र (ईव्हीएम मशिन) सुरक्षित नाहीत, असा दावा करून खळबळ उडवून देणाऱ्या टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी यू टर्न घेतला. त्यांनी कॅलिफॉर्नियातील मतपत्रिकेच्या मतमोजणीवरून नाराजी व्यक्त केली. भारतामधील दोन राज्यांसह विविध पोटनिवडणुकीतील मतमोजणी वेगानं करणाऱ्या भारतीय निवडणूक यंत्रणेचं मस्क यांनी कौतुक केलं.
संगणकीय प्रोग्राम हॅक करता येऊ शकतात, असा दावा करत ईव्हीएमच्या वापराबाबत एक्स मीडियाचे मालक एलॉन मस्क यांनी संशय करणारे वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य भारतात लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान केल्यानं काँग्रेसह इतर विरोधकांनी ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर एलॉन मस्क यांनी भारतीय निवडणूक प्रक्रियेचं कौतुक करणारी पोस्ट केल्यानं ते चर्चेचा विषय ठरत आहेत.
भारतामधील निवडणुकीत 640 दशलक्ष मतांची मोजणी एका दिवसात करण्यात आली, ही माहिती देणारी पोस्ट टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी एक्स मीडीयावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी भारतामधील निवडणूक यंत्रणेचं कौतुक केलं आहे. "भारतामध्ये दोन राज्यांसह पोटनिवडणुकांचे निकाल एका दिवसात लागतात. मात्र, कॅलिफॉर्नियामध्ये अजूनही मतमोजणी सुरू आहे," अशी पोस्ट करत त्यांनी कॅलिफॉर्नियातील निवडणूक यंत्रणेवर टीका केली.
- डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. मात्र, कॅलिफॉर्नियामध्ये दोन आठवडे उलटूनही 3 लाख मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झालेली नाही.
कॅलिफॉर्नियात कशामुळे मतमोजणीला होतोय उशीर
- 39 दशलक्ष लोकसंख्या असलेले कॅलिफॉर्निया हे अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्येचं शहर आहे. 5 नोव्हेंबर रोजी झालेली निवडणुकीत 16 दशलक्ष नागरिकांनी मतदान केले.
- निवडणुकीत मतमोजणी आणि पडताळणीची प्रक्रिया अत्यंत संथगतीनं सुरू आहे.
- कॅलिफॉर्नियाचा विस्तार आणि पोस्टानं होणारं मतदान यामुळे मतमोजणीला उशीर लागत आहे.
- स्थानिक निवडणूक अधिकाऱ्याच्या माहितीनुसार मतमोजणीसाठी दोन आठवड्यांहून अधिक जास्त वेळ लागतो. पत्रामधून येणाऱ्या प्रत्येक मताची पडताळणी आणि सत्यता पाहण्याची किचकट प्रक्रिया असते.
मस्क भारतात ब्रॉडबँड सुविधा देण्याकरिता उत्सुक-भारत सरकारनं सॅटेलाईट ब्रॉडबँडसाठी लागणाऱ्या स्पेक्ट्रमचे वाटप लिलावानं न करताना प्रशासकीय पद्धतीनं वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं 17 ऑक्टोबर रोजी मस्क यांनी कौतुक केलं होतं. विशेष बाबा म्हणजे रिलायन्सचे सीईओ मुकेश अंबानी आणि एअरटेल सुनिल भारती मित्तल यांनी लिलावातून स्पेक्ट्रमचे वाटप व्हावे, अशी मागणी केली आहे.
विरोधकांकडून मतदान यंत्राबाबत प्रश्नचिन्ह-महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीला 46 जागांवर विजय मिळविता आला. या निकालात काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांचा पराभव झाला. या निकालाबाबत शिवसेनेसह (उद्धव ठाकरे) काँग्रेसकडून शंका व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेचे (युबीटी) खासदार संजय राऊत यांनी शनिवारी पोस्ट करत निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, "महाराष्ट्राचा निकाल हा जनतेचा कौल नाही. ballot पेपर (मतपत्रिका) वर पुन्हा निवडणूक घ्या! जगाच्या पाठीवर निवडणुकीत इतका फ्रॉड झाला नसेल. हा निकाल मान्य नाही! नाही! त्रिवार नाही! लोकशाही आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई सुरूच राहील!" महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनीदेखील विधानसभेचा निकाल अविश्वसनीय, अनपेक्षित व स्वीकारण्याजोगा नाही, असे मत शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. या संशयास्पद निकालाबाबत पक्षाकडून पूर्ण चौकशी आणि सखोल कारणमीमांसा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.