सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील बड्या नेत्यांची मुलं देखील मैदानात उतरली होती. अनेक ठिकाणी काका-पुतण्या, वडील-मुलगा, भाऊ-भाऊ अशी लढत पाहायला मिळाली. त्यामुळं या नेत्यांच्या लढतींकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तीन मतदारसंघांचा निकाल जाहीर झाला आहे. कुडाळ मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत निलेश राणे यांनी वैभव नाईक यांचा पराभव केला, तर कणकवलीमधून नितेश राणे हे विजयी झाले आहेत. तसंच सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेनेचे दीपक केसरकर विजयी झाले आहेत.
राणे बंधू विजयी : मुंबईत ठाकरे बंधू आणि कोकणातील राणे बंधू यांच्या लढतींकडेही राज्याचं लक्ष लागलं होतं. यंदा कोकणात आमदार नितेश राणे आणि निलेश राणे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. भाजपाचे नितेश राणे हे कणकवलीमधून निवडणूक लढवत होते, तर शिवसेनेचे निलेश राणे हे कुडाळमधून निवडणूक लढवत होते. हे दोघेही भाऊ विजयी झाले आहेत.
"मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून बोलत होतो, कणकवली, देवगड, वैभववाडीच्या जनेतेने मला तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी द्यायची हे ठरवलेलं. 262 गावात फिरताना मला ते जाणवलं होतं. - नितेश राणे, आमदार
राणे बंधूंसाठी प्रतिष्ठेची लढाई : भाजपा खासदार नारायण राणे यांचे दोन्ही मुलं यंदा आपलं राजकीय भवितव्य पणाला लावून निवडणुकीच्या मैदानात होते. कोकणातील या दोन्ही राणे बंधूंसाठी ही प्रतिष्ठेची लढाई होती. कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाने नितेश राणे यांना उमेदवारी दिली होती. येथे ठाकरेंच्या शिवसेनेने संदेश पारकर यांना तिकीट दिलं होतं. दोघांमध्ये 'काटे की टक्कर' पाहायला मिळाली. तर, निलेश राणे यांना कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेनं उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधात आमदार वैभव नाईक मैदानात होते. वैभव नाईक हे ठाकरेंच्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्यानं त्यांचं पारडं जड मानलं जात होतं.
हेही वाचा -