मुंबई - 'स्काय फोर्स' या चित्रपटातून अक्षय कुमारबरोबर चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता वीर पहाडिया सतत चर्चेत असतो. वीर सोशल मीडियावर त्याच्या चालण्याची शैली, बोलण्याची पद्धत आणि डान्ससाठी प्रसिद्ध आहे. त्याचे अनेक रील्स व्हायरल होत आहेत. दरम्यान, आता धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. विनोदी कलाकार प्रणित मोरेच्या टीमनं एक खुलासा केला आहे की, काही लोकांनी वीर पहाडियाचे चाहते असल्याचा दावा करत प्रणितला मारहाण केली. हे प्रकरण महाराष्ट्रातील सोलापूर येथील आहे. 2 फेब्रुवारी रोजी कॉमेडियन प्रणित मोरेनं 24 के क्राफ्ट ब्रूझ येथे स्टँड-अप सादरीकरण केलं. यानंतर प्रणितनं शोमध्ये आलेल्या चाहत्यांना भेट दिली. 11 ते 12 लोक हे प्रणितला भेटण्यासाठी गेले होते. या लोकांनी त्याच्याबरोबर फोटो काढण्याऐवजी त्याला मारायला सुरुवात केली.
वीरच्या नावाखाली विनोदी कलाकार प्रणित मोरेला मारहाण : या भांडणात सहभागी असलेल्यांपैकी एकाची ओळख प्रणित मोरेच्या टीमनं तन्वीर शेख म्हणून केली आहे. तन्वीर या ग्रुपमधील मुख्य होता. या टोळीनं प्रणित मोरेला मारल्यानंतर त्याला धमकीही दिली. या धमकीत त्या व्यक्तीनं म्हटलं, "पुढच्या वेळी वीर पहाडिया बाबांवर विनोद करून पाहा.' याशिवाय प्रणित मोरे यांच्या टीमनं असंही सांगितलं की, 24 के क्राफ्ट ब्रूझमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा नव्हती. हाणामारीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मात्र कार्यक्रमस्थळी असलेले लोक त्यांना सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार देत आहे. प्रणित मोरे आणि त्याच्या टीमनं पोलिसांची मदतही मागितली, मात्र ते देखील घटनास्थळी पोहोचले नाही. प्रणितनं या प्रकरणाबाबत ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. याशिवाय त्यानं अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची विनंतीही केली आहे.
![Veer pahariya](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/05-02-2025/23479781_rj.jpg)
वीर पहाडियानं माफी मागितली : दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अभिनेता वीर पहाडियाची प्रतिक्रियाही समोर आली आहे. प्रणित मोरेच्या पोस्टवर कमेंट करून वीरनं या संपूर्ण प्रकरणावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. याप्रकरणी वीरनं म्हटलं की, यात त्याचा कोणताही हात नाही. त्यानं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवरही एक लांब नोट शेअर करून कॉमेडियन आणि त्याच्या चाहत्यांना माफी मागितली आहे. याशिवाय, वीरनं प्रणितला वचन दिलं आहे की, तो त्याच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना शिक्षा मिळवून देण्यासाठी वैयक्तिकरित्या प्रयत्न करेल. तसेच 'स्काय फोर्स' चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटामध्ये वीरबरोबर अक्षय कुमार व्यतिरिक्त निमरत कौर आणि सारा अली खान या अभिनेत्री दिसल्या आहेत. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटानं आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 102.95 कोटीची कमाई केली आहे. 'स्काय फोर्स' चित्रपटामध्ये वीरच्या कामाचे खूप कौतुक झाले आहे.
हेही वाचा :