ETV Bharat / politics

पुरोगामी सातारा जिल्ह्यावर महायुतीनं रोवला झेंडा, ७० वर्षांनी कराड दक्षिणमधून काँग्रेस हद्दपार

सातारा जिल्ह्यावर महायुतीनं आपला झेंडा रोवत काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उध्दवस्त केला. तीन विद्यमान आमदार पराभूत झाले. या निकालाने साताऱ्याच्या पुरोगामित्वाला मोठा धक्का बसला आहे.

Satara district
सातारा जिल्ह्यातील राजकीय नेते (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

सातारा : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवत महाविकास आघाडीचा सुफडा साफ केला. महायुतीच्या या झंझावातात कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री, कराड उत्तरमध्ये माजी सहकार मंत्री आणि फलटणच्या विद्यमान आमदारांना देखील पराभवाचा झटका बसला. तसेच भाजपाचे डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे आणि सचिन कांबळे पाटील या नव्या चेहऱ्याऱ्यांचा विधीमंडळात प्रवेश झाला आहे.

काँग्रेसच्या मातीत फुललं कमळ : कराड दक्षिण हा स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता. ज्येष्ठ विचारवंत दिवंगत यशवंतराव मोहिते यांनी २५ वर्षे आणि त्यानंतर माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांनी सलग ३५ वर्षे कराड दक्षिण दक्षिणचं विधीमंडळात प्रतिनिधीत्व केलं. २०१४ पासून दहा वर्षे पृथ्वीराज चव्हाण हे आमदार होते. भाजपच्या डॉ. अतुल भोसले यांनी त्यांना दोनवेळा आव्हान दिलं होतं. तिसऱ्या वेळी त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा दणदणीत पराभव करून कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचं कमळ फुलवलं.

कराड उत्तरच्या मतदारांनी धनगरवाडीचं पाणी दाखवलं : कराड उत्तर हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा मतदार संघ होता. त्यांच्या पश्चात ज्येष्ठ नेते पी.डी. पाटील, बाबुराव कोतवाल, दिवंगत केशवराव पवार, शामराव अष्टेकर, पुन्हा पी. डी. पाटील आणि १९९९ पासून २०२४ पर्यंत बाळासाहेब पाटील आमदार होते. यंदा मात्र भाजपाच्या मनोज घोरपडेंनी ४२,६९९ इतक्या विक्रमी मताधिक्क्याने त्यांचा दणदणीत पराभव केला. गेली अनेक वर्षे हणबरवाडी-धनगरवाडी योजनेचं घोंगडं भिजत पडलं आहे. त्यामुळं लोक नाराज होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटलांनी उदयसिंह उंडाळकरांना सत्तेचा वापर करून पाडलं. त्याचे उट्टे काढण्यासाठी कराड उत्तरमधील उंडाळकर गटाने भाजपा उमेदवाराला उघड साथ दिल्याचंही स्पष्ट झालं.

पाटणमध्ये पारंपारिक विरोधकांमध्येच लढत : पाटण विधानसभा मतदारसंघात शंभूराज देसाई चौथ्यावेळी आमदार झाले. यावेळी त्यांच्या मताधिक्क्यातही वाढ झाली. लाडकी बहीण योजनेचा त्यात मोठा वाटा दिसत आहे. अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी उध्दव ठाकरेंविरोधात बंड केलं. त्यामध्ये शंभूराज देसाई आघाडीवर राहिल्यानं या निवडणुकीत ते उध्दव ठाकरेंच्या निशाण्यावर होते. प्रचार सभेत ठाकरी शैलीत उध्दव ठाकरेंनी शंभूराज देसाईवर टीका केली होती. त्यांच्या विरोधातील बंडखोर उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांच चिन्ह (रिक्षा) नवं होतं. मशाल अथवा तुतारी चिन्ह असतं तर किमान तगडी लढत झाली असती.

शिवेंद्रराजेंचा राज्यात सर्वाधिक मतांनी विजय : साताऱ्याच्या राजघराण्यातील मनोमिलनाचा करिष्मा यंदा विधानसभा निवडणुकीच्या निकालात दिसून आला. लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेउन आमदार शिवेंद्रराजेंनी त्यांना निवडून आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. त्याची परतफेड करण्यासाठी उदयनराजेंनी देखील शिवेंद्रराजेंना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी पायाला भिंगली लावली होती. या दोन्ही बंधुंच्या मनोमिलनामुळं शिवेंद्रराजे राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी झाले. त्यांच्या विरोधातील शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार यांचा उच्चांकी मतांनी पराभव झाला.

किती बी समोर येउ द्या, त्यांना एकटा बास : माण विधानसभा मतदार संघात भाजपच्या आमदार जयकुमार गोरेंनी विजयाचा चौकार मारत सर्व विरोधकांना पराभवाची धूळ चारली. गोरेंच्या पराभवासाठी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) मातब्बर एकत्र आले होते. त्याचवेळी शेखर गोरेंनी आपल्या भावाला पाठींबा दिल्यानं जयकुमार गोरेंची ताकद वाढली. तसेच दुष्काळी पट्ट्यात पाणी आणल्याचा त्यांना फायदा झाला. दुष्काळमुक्तीसाठी साथ द्या, माण तालुका पाणीदार करून दाखवतो, या त्यांच्या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद दिला.

वाईमध्ये शरद पवारांच्या आवाहनाला झिडकारलं : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत गेलेल्या आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात शरद पवारांनी माजी मंत्री मदन पिसाळ यांच्या स्नुषा आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरूणादेवी पिसाळ यांना उमेदवारी दिली होती. गद्दारांना पाडा, असं आवाहन करत शरद पवारांनी मकरंद पाटलांच्या अडचणी वाढवल्या होत्या. मात्र, त्याचा कसलाही परिणाम निवडणुकीत झाला नाही. मकरंद पाटलांनी आपली विजयी घोडदौड कायम राखली.

कोरेगावात शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव : सर्वात अटीतटीची लढत होण्याची शक्यता असलेल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या (शिंदे पक्ष) आमदार महेश शिंदेंनी दुसऱ्यांदा बाजी मारत राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) शशिकांत शिंदेंचा पराभव केला. लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेतही झालेला हा पराभव शशिकांत शिंदेंच्या जिव्हारी लागणारा आहे. उसाचं जळीत, तडीपारीच्या नोटीसांवरून कोरेगावचं राजकारण चांगलंच पेटलं होतं. कोणताही गंभीर गुन्हा नसताना फक्त एकाच गटातील लोकांना तडीपारीच्या काढलेल्या नोटीसा शशिकांत शिंदेंनी मागे घ्यायला लावल्या होत्या. तरीही मोठ्या फरकाने त्यांचा पराभव झाला.

लोकसभेचा वचपा विधानसभा निवडणुकीत काढला : फलटण विधानसभा मतदार संघातून दोनवेळा निवडून आलेल्या आमदार दीपक चव्हाण यांना यंदा पराभवाची चव चाखावी लागली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकरांचा गट अजित पवारांसोबत गेला. मात्र, लोकसभा निवडणुकीत राजे गटाने भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना उघड विरोध केल्यानं त्यांचा पराभव झाला. शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील विजयी झाले. त्याचा वचपा काढण्यासाठी रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी सचिन कांबळे-पाटील यांना अजित पवार गटातून उमेदवारी मिळवत रामराजे गटाच्या आमदार दीपक चव्हाणांचा पराभव केला.

हेही वाचा -

  1. भाजपाचा मुख्यमंत्री ठरल्यास आम्ही एकमुखाने देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊ- चंद्रकांत पाटील
  2. विधानसभा निवडणुकीत कोण विजयी? पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
  3. विधानसभा निवडणुकीत पाहा कोण दिग्गज उमेदवार झाले पराभूत...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.