नाशिक : विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात महायुतीला भरघोस यश मिळालं. 15 जागांपैकी तब्बल 14 जागा महायुती सरकारला मिळाल्यात तर एक जागा एमआयएमला मिळाली. मात्र, यात सर्वाधिक सात जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळाल्यानं अजित पवारच नाशिकमध्ये 'दादा' असल्याचं दिसून आलं.
'एकच वादा अजित दादा' म्हणत नाशिककरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पारड्यात मतांचा पाऊस पाडला. नाशिक जिल्ह्यात महायुतीला मोठं यश मिळालं. यात 15 जागांपैकी तब्बल सात जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले. विशेष म्हणजे या उमेदवारांसमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (शरदचंद्र पवार) उमेदवारांचं आव्हान होतं. अशात येवला मतदारसंघातून छगन भुजबळ, देवळाली मतदारसंघातून सरोज अहिरे, दिंडोरी मतदार संघातून नरहरी झिरवाळ, इगतपुरी मतदारसंघातून हिरामण खोसकर, निफाड मतदार संघातून दिलीप बनकर आणि कळवण मतदारसंघातून नितीन पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निवडून आलेत.
अजित पवारांनी मागितली शेतकऱ्यांची माफी : नाशिक जिल्ह्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. मात्र, लोकसभा निवडणूक काळात केंद्र सरकारकडून कांद्यावर लावलेले निर्बंध आणि निर्यात बंदी यामुळं शेतकरी वर्ग हा महायुती सरकारवर काहीसा नाराज होता. याचाच फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला. जिल्ह्यातील दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना यामुळे पराभवाचा सामना करावा लागला होता.
शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नदिंडोरी मतदार संघातून भाजपाच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) उमेदवार भास्कर भगरे यांनी तर नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा शिवसेनेचे (उबाठा) राजाभाऊ वाजे यांनी पराभव केला होता. यानंतर अजित पवार यांनी विधानसभा प्रचारा दरम्यान आपल्या भाषणात कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानं लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी महायुतीला झटका दिला. या निर्णयानं शेतकऱ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी जाहीर माफी मागतो, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. "कांदा निर्यातीवर बंदी घालण्याची चूक झाल्याचे मी मान्य करतो. यापुढे कुठल्याही परिस्थितीत कांदा निर्यातबंदी करायची नाही. हे केंद्र सरकारला सांगण्यात आले, " असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांसोबत असल्याची ग्वाही दिली होती.
महायुतीला या योजनांनी तारलं : महाराष्ट्रात महायुती सरकारनं शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजना, महिलांसाठी लाडकी बहीण योजना, ज्येष्ठांसाठी, युवकांसाठी स्टायपेंड अशा वेगवेगळ्या योजना आणल्या. तसेच शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिली. त्याचा मतदारांवर परिणाम झाला. तसंच भाजपानं 'बटेंगे तो कटेंग, एक हैं तो सेफ हैं' असे मुद्दे प्रचारात आणले. पण महाराष्ट्राचा विकास कसा केला, हे सुद्धा ते सांगत होते. महाविकास आघाडीला मात्र महाराष्ट्राचा विकास कसा करणार? हे सांगता आलं नाही, ही महाविकास आघाडीच्या पराभवाची प्रमुख कारणे सांगता येईल.
हेही वाचा -