मुंबई : राज्यात बुधवारी विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडल्या. विधानसभेच्या २८८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत जवळपास 66 टक्के मतदान झालं. शनिवारी निवडणुकीची मतमोजणी पार पडली. निवडणुकीत महायुतीची लाट असल्याचं निकालात स्पष्ट झालं.
राणे बंधू विजयी : निवडणुकांसाठी राज्यातील बड्या नेत्यांची मुले देखील मैदानात उतरली होती. अनेक ठिकाणी सख्खे, चुलत भाऊ, नवरा -बायको, काका-पुतण्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या नेत्यांच्या लढतींकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. कुडाळ मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत निलेश राणे यांनी वैभव नाईक यांचा पराभव केला. कुडाळ आणि कणकवली मतदारसंघात राणे बंधू विजयी झाले.
एक देशमुख विजयी, एक पराभूत : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज विलासराव देशमुख यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूरमध्ये धीरज देखमुख यांना पराभवाचा धक्का बसला. लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांचा पराभव झाला. तर लातूर शहरमधून त्यांचे बंधू अमित देशमुख विजयी झाले आहेत. लातूर शहरात डॉ.अर्चना पाटील चाकूरकर यांना भाजपानं काँग्रेसचे अमित देशमुख यांच्याविरोधात रिंगणात उतरवलं होतं. अमित देशमुख हे येथून तीनवेळा आमदार आहेत.
काका विरुद्ध पुतण्या : बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. काका विरुद्ध पुतण्या अशा या लढतीमध्ये अखेर काका अजित पवार यांचा विजय झाला. तर पुतण्या युगेंद्र पवार यांचा पराभव झाला. तसंच अहिल्यानगरच्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि उमेदवार रोहित पवार हे विजयी झाले आहेत.
पतीविरोधात पत्नी विजयी : कन्नड विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडं सर्वांच्या नजरा होत्या. या मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांची लेक संजना जाधव या रिंगणात होत्या. विशेष म्हणजे, त्या आपल्या पतीच्या विरोधात ही निवडणूक लढवत होत्या. संजना जाधव यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. यात संजना जाधव यांचा विजय झालाय.
हेही वाचा -