छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात नऊ जागांवर महायुतीला पुन्हा एकदा जनतेचा कौल मिळाला आहे. जिल्ह्यात भाजपा 3, शिंदेंची शिवसेना 6 जागावर विजयी झाल्या आहेत. त्यामुळं ठाकरे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या सर्व मतदारसंघात मोठा धक्का मतदारांनी दिलाय. काही ठिकाणी शेवटपर्यंत अटीतटीची लढत अनुभवायला मिळाली. लक्षवेधी असलेल्या कन्नड मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजना जाधव यांनी हर्षवर्धन जाधव यांचा पराभव केलाय. तर सिल्लोड मतदारसंघात शेवटच्या फेरीपर्यंत धाकधूक लागली असताना, ठाकरेंच्या पक्षाने फेर मतमोजणीची मागणी केली.
भाजपानं जागा राखल्या : जिल्ह्यातील गंगापूर, फुलंब्री आणि पूर्व मतदारसंघ भाजपाचे हक्काचे मतदारसंघ मानले जातात. त्याठिकाणी त्यांनी आपली ताकद कायम ठेवत जागा राखण्यात यश मिळवलं. गंगापूर मतदारसंघात प्रशांत बंब यांची सलग चौथ्यांदा निवडणूक जिंकली. त्यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) उमेदवार सतीश चव्हाण यावेळी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला होता. मराठा आरक्षणाचा मुद्दा, काही दिवसात प्रशांत बंब यांच्या विरोधात प्रसारित झालेले व्हिडिओ त्यामुळं भाजपाला यंदा फटका बसेल असं वाटतं असताना, प्रशांत बंब यांनी विजय मिळवला. पूर्व मतदार संघ लक्षवेधी मतदार संघातील एक होते. राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या विरोधात एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आव्हान निर्माण केलं होतं. सुरुवातीला जलील 57 हजारांची मताधिक्य असताना शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये सावे यांनी कमी मतांनी विजय मिळवला. तर फुलंब्री मतदार संघात हरिभाऊ बागडे राज्यपाल पदी नियुक्ती झाल्यानं अनुराधा चव्हाण यांना संधी मिळाली आणि त्यांचा विजय झाला.
ठाकरेंचे मतदार शिंदेंच्या पाठीशी : संभाजीनगर जिल्हा ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, लोकसभेत धनुष्यबाण चिन्हाला मतदान मिळालं मात्र, ठाकरे यांना नाही. त्या पराभवातून विधानसभा निवडणुकीत बाहेर पडण्याचा मनसुबा उद्धव ठाकरे यांचा होता. मात्र, त्यांची साफ निराशा झाली, सहा मतदारसंघात उमेदवार उभे असताना एकही उमेदवार निवडून आणण्यात त्यांना यश मिळालं नाही. कन्नड मतदारसंघात त्यांच्याकडं असलेल्या एकमेव आमदार उदयसिंह राजपूत यांचा देखील पराभव झाला. तर सिल्लोड, मध्य, पैठण, वैजापूर, पश्चिम या मतदारसंघात गद्दार आमदारांना पडण्याची नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. सर्व ठिकाणी शिंदे गटाच्या शिवसेनेला विजय मिळाला. त्यामुळं ठाकरेंचे मतदार शिंदेंच्या पाठीशी उभे राहिले असल्याचं चित्र पाहायला मिळालं.
दोन मतदार संघात पोलिसांचा सौम्य लाठीमार : जिल्ह्यातील दोन मतदारसंघात पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी 57 हजारांचे अशी मोठी आघाडी घेतली होती. मात्र, हळूहळू ती आघाडी कमी होत गेली. त्यावेळी एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही ती गर्दी बाजूला सरकत नव्हती, उलट लावलेले बॅरिगेड कार्यकर्त्यांनी तोडले. त्यामुळं गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला, गर्दी पांगल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. तिथे भाजपाचे अतुल सावे विजयी झाले. तर, सिल्लोड मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सुरेश बनकर यांच्यात मुख्य लढत होत असताना, शेवटच्या फेरीपर्यंत मतांची आकडेमोड धाकधूक वाढवणारी होती. यात मतमोजणीवर सुरेश बनकर यांनी आक्षेप घेतला. मतमोजणी केंद्राबाहेर शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यावेळी पोलिसांनी तिथे देखील सौम्य लाठीमार करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या मतदारसंघात अखेर अब्दुल सत्तार यांचा विजय झाला.
- औरंगाबाद पूर्व - भाजपा उमेदवार अतुल सावे (92,471) यांनी एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (90,694) यांचा 1777 मतांनी पराभव केला.
- औरंगाबाद मध्य - शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल (85459) यांनी एमआयएम पक्षाचे उमेदवार नासेर सिद्दीकी (77340) यांचा 8119 मतांनी पराभव केला.
- औरंगाबाद पश्चिम - शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट (1,20,722) यांनी ठाकरेंच्या राजू शिंदे (1,04,898) यांचा 15824 मतांनी पराभव केला आहे.
- फुलंब्री - भाजपाच्या अनुराधा चव्हाण (1,34,065) यांनी काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे (1,01,787) यांचा 32278 पराभव केला.
- पैठण - शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार विलास भुमरे (132474) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे दत्ता गोरडे (103282) यांचा 29 हजार 192 मतांनी पराभव केला.
- गंगापूर - भाजपाचे प्रशांत बंब (1,25,034) यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सतीश चव्हाण (1,19,613) यांचा 5400 मतांनी पराभव केला.
- वैजापूर - शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रमेश बोरनारे (133627) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे दिनेश परदेशी (91969) यांचा 41,658 पराभव केला.
- कन्नड - शिंदेंच्या शिवसेनेचे संजना जाधव (84492) यांनी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव (66291) यांचा 18201 मतांनी पराभव केला.
- सिल्लोड - शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार (137960) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुरेश बनकर (135540) यांचा 2420 मतांनी पराभव केला.
हेही वाचा -