नाशिक : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला 2027 मध्ये 'सिंहस्थ कुंभमेळा' (Simhastha Kumbh Mela) होणार आहे. त्यासाठी आता जिल्हाधिकारी तसंच महानगरपालिके कडून तब्बल 6 हजार 900 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. दर बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळामुळं नाशिक शहराचा कायापालट होणार असून विकासाला गती मिळणार आहे.
6 हजार 900 कोटींचा अंतिम आराखडा : लोकसभा, विधानसभा निवडणुका संपताच आता 2027 मध्ये होत असलेल्या सिहस्थ कुंभमेळा नियोजनाला गती मिळाली आहे. या कुंभमेळ्यात पाच लाख साधू महंत तसंच पाच कोटी भाविक येण्याची शक्यता प्रशासनानं गृहीत धरली आहे. त्यासाठी तब्बल 6 हजार 900 कोटींचा अंतिम आराखडा जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आला आहे. यामध्ये नऊ उड्डाणपूल, तीन जलकुंभ, एक मोठं रुग्णालय, 350 किलोमीटरचे अंतर्गत रस्ते, 5 हजार दिशादर्शक कमानी, 60 किलोमीटर बॅरिकेटिंग, एटीएम, दूध व्यवस्था, बस वाहतूक व्यवस्था, 5 हजार सीसीटीव्ही कॅमेरे, 2 हजार पथदीप, 15 हजार फिरती शौचालयं आदींचं नियोजन करण्यात आलं आहे.
साधूग्राममध्ये पाच लाख साधूंची व्यवस्था : नाशिक शहरातील पंचवटी येथील साधूग्रामसाठी 500 एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे. तेथे 3 हजार प्लॉटचं नियोजन करण्यात आलं आहे. यात 3 प्रमुख आखाडे आहेत. तर जवळपास पाच लाख साधूंची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. प्रत्येक पर्वणीला 80 लाख भाविक येण्याची शक्यता गृहित धरून तीन पर्वणी आणि इतर महत्वाचे दिवस मिळून पाच कोटी भाविक नाशिकमध्ये येतील असा अंदाज गृहीत धरण्यात आला आहे.
पाच हजार सीसीटीव्हीची राहणार नजर : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येनं भाविक दाखल होतात. यंदा वाढत्या गरजा आणि व्यवस्थापनाचं योग्य नियोजन लक्षात घेता कुंभमेळा क्षेत्रात सुविधांचे नकाशे तयार करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीच्या सूचना प्रत्येक विभागाला देण्यात आल्या आहेत. तसंच शहरात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, चांगल्या प्रकारे नियोजन व्हावं यासाठी शहरात पाच हजार सीसीटीव्हींची नजर राहणार आहे. तसंच लाखो भाविकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचं विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सांगितलं.
श्री रामाच्या जीवनावर आधारित देखावे : नाशिकच्या पंचवटी परिसरातील सीतागुफा, काळाराम मंदिर, रामकुंड या परिसराला प्राचीन पंचवटीचं स्वरूप देण्यात येणार आहे. सर्व रस्ते आणि घरांच्या प्रथम दर्शनी भागाचं नूतनीकरण करण्यात येणार आहे. कुंभस्नान होणाऱ्या रामकुंड आणि लक्ष्मी कुंडाच्या मध्यभागी सतत जलप्रवाही भव्य गोमुख तयार करण्यात येणार आहे. श्री काळाराम मंदिरासमोरील जागेत प्रभू श्रीरामाच्या जीवनावर आधारित देखावे उभारण्यात येणार आहेत. रामकुंडात प्रभू रामाचे बाण मारतानाचे शिल्प, गांधी तलावावर लेझर शो, रामकुंडातील पाणी स्वच्छतेसाठी फिल्टर, अस्थीसोबत राख विसर्जनासाठी स्वतंत्र कुंड असणार आहे.
लवकरच कामाला सुरुवात होणार : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या पर्यटन विभागानं शहराचा आयकॉनिक स्थळात समावेश केला आहे. यासाठी 100 कोटी निधीला मंजुरी दिली आहे. पौराणिक सीता गुफा, काळाराम मंदिर, रामकुंड परिसर कॉरिडॉर तयार केला जाईल. सल्लागार नेमून आराखडा तयार केला जाणार आहे. त्याचं काम लवकर सुरू होईल असं नाशिक महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी सांगितलं.
नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्ग होणार सहापदरी : नाशिक ते त्र्यंबकेश्वर हा चौपदरी मार्ग सहापदरी करण्यात येणार असून त्यासाठीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागानं तयार केला आहे. नव्याने दोन लेनमध्ये पालखी मार्गाचा विचार करुन मार्गाची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी 240 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आराखड्यात नमूद करण्यात आलं आहे.
25 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार : पोलीस प्रशासनाच्या वतीनं झिरो कॅज्युअलिटी सेफ सिंहस्थ मेळावा हा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. 2027 च्या कुंभमेळ्यात प्रमुख तीन पर्वणी मिळून सुमारे चार ते पाच कोटी भाविक हजेरी लावणार असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शहर पोलिसांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची अतिरिक्त कुमकसह सुमारे 25 हजार पोलिसांचा फौजफाटा लागणार आहे.
कुंभमेळ्यात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर : कुंभमेळ्यात बॉम्ब शोधक-नाशक (बीडीडीएस) पथकाला तब्बल दहा कोटी रुपये उपकरणे खरेदीसाठी आवश्यक असल्याचं आराखड्यात म्हटलं आहे. तसंच आगामी कुंभमेळ्यात प्रथमच ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर पोलिसांकडून करण्यात येणार आहे. एकूण आवश्यक ड्रोन कॅमेरा आणि रिलेटेड ऍक्टिव्हिटीज जीआयएस मॅपिंग आगामी कुंभमेळ्यात केली जाणार आहे. यासाठी एकूण 25 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यंदाच्या कुंभमेळ्यात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता शहरात निरीक्षणासाठी 100 ठिकाणी मनोरे उभारण्यात येणार आहेत. यासाठी जवळपास दहा कोटी रुपयांचा खर्च पोलिसांना अपेक्षित आहे.
कुंभमेळा महत्व : भारतात दर तीन वर्षांनंतर एकदा या पद्धतीने बारा वर्षात नाशिक( त्र्यंबकेश्वर), प्रयागराज, उज्जैन, हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळा भरतो. कुंभमेळा हा धार्मिक उत्सव असून यासाठी कोणालाही औपचारिक निमंत्रण दिलं जात नाही. असं असूनही भाविक या सोहळ्याला करोडोंच्या संख्येत सहभागी होतात. या कुंभमेळ्यात शाही स्नानाला विशेष महत्व आहे. यावेळी नदीमध्ये स्नान करून सूर्याला अर्घ्य देत नदीची पूजा केली जाते. यावेळी साधू महंत वेगवेगळ्या आखाड्यातून मिरवणूक काढून येत नदीत शाही स्नान करतात. यावेळी साधु-महंतांना सर्व प्रथम शाही स्नान करण्याचा मान दिला जातो, अशी माहिती सतीश शुक्ल यांनी दिली.
ऑगस्ट 2027 होणार कुंभमेळा : सिंह राशीमध्ये जेव्हा गुरू येतो त्यावेळी नाशिकचे सिहस्थ कुंभ स्नान होत असते. यंदा 31 ऑक्टोबर 2026 ला दुपारी 12.30 वाजता सिंह राशीमध्ये गुरूंचं आगमन होत आहे. त्यामुळं 2027 च्या ऑगस्ट महिन्यामध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचे पाहिले पर्वणी स्नान आहे. 1956 साली याच पद्धतीचा त्रिखड कुंभमेळा आला होता. त्यामुळं यंदाच्या कुंभमेळ्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिहस्थ कुंभमेळा भरत असतो. त्यात नाशिकला वैष्णवाची स्नान होतात तर त्र्यंबकेश्वरला शैव लोकांचे स्नान होत असते अशी माहिती, नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी दिली.
हेही वाचा -