मुंबई : भाजपा आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीवर (Prajakta Mali) गंभीर आरोप केले होते. यानंतर प्राजक्ता माळीनं पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे.
...म्हणून मी शांत राहिले : "आमदार सुरेश धस यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना केलेल्या विधानाचा मी निषेध करते. गेल्या दीड महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. तेव्हापासून मी अत्यंत शांततेनं ट्रोलिंगला सामोरी जातेय. माझी शांतता म्हणजे मूकसंमती नाही. तर हतबलता आहे. एक व्यक्ती काहीतरी बरळून जाते. त्यावर हजारो व्हिडिओ बनतात. एका सेलिब्रिटीला त्यावर बोलणं भाग पाडलं जातं. यावर प्रतिक्रिया येतात. महिलांची अब्रू निघते आणि सर्वांचं मनोरंजन होतं राहातं. मला या चिखलात दगड टाकायचा नव्हता. म्हणून मी शांत राहिले." असं प्राजक्ता माळी म्हणाली.
सुरेश धस यांनी माफी जाहीर माफी मागावी : "एका सांस्कृतिक कार्यक्रमात काढलेला फोटो, ती आमची एकमेव भेट, यावर खूप मोठा गदारोळ करण्यात आला. ही गोष्ट खोटी असल्यानं त्यावर मी बोलले नाही. माझं कुटुंब, मित्र परिवार, महाराष्ट्रातील जनता माझ्यासोबत आहे. कोणीही माझ्याकडे शंकेनं पाहिलं नाही. ट्रोलिंगला धीराने सामोरे जा, असं सर्वांनी सांगितलं. वैयक्तिक राजकारणासाठी तुम्ही महिला कलाकारांचा वापर करणं थांबवा. तसंच सुरेश धस यांनी माझी जाहीर माफी मागावी" असं अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाली. यासंदर्भात महिला आयोगात तक्रार दाखल केल्याचंही यावेळी प्राजक्तानं सांगितलं.
काय आहे प्रकरण ? : सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत प्राजक्ता माळीसह रश्मिका मंदान्ना, सपना चौधरी यांचीही नावं घेतली होती. अवैधरित्या जमिनी बळकावून त्या पैशातून इव्हेंट मॅनेजमेंट केलं जात असल्याचा दावा केला होता.
हेही वाचा -