अमरावती : कुडकुडवणारी थंडी आणि थंडगार वातावरणात छान मातीच्या हंडीत शिजणारं मटण हे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी भरणाऱ्या बहिरम यात्रेचं खास वैशिष्ट्य. महाराष्ट्रात सर्वाधिक 40 दिवस चालणाऱ्या या यात्रेत मातीच्या हंडीत शिजणारं मटण या ठिकाणी चाखायला मिळतं. विशेष म्हणजे या यात्रेत लाखोच्या संख्येनं मातीच्या हंडी विदर्भाच्या विविध भागातून आलेले खवय्ये खरेदी करतात. या यात्रेत गुजरात राज्यातून लाखोच्या संख्येनं मातीच्या हंडी विक्रीसाठी सजल्यात. एकूणच बहिरम बाबा यात्रेचं वैशिष्ट्य आणि मातीच्या हंडीत खास मटण शिजवण्याच्या यात्रेतील प्रथेसंदर्भात "ईटीव्ही भारत" चा हा स्पेशल रिपोर्ट.
यात्रेत मटण हंडीची अशी रुजली प्रथा : चांदुरबाजर तालुक्यात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर 'बहिरम यात्रा' भरते. एका पहाडावर बहिरम बाबाचं भलं मोठं मंदिर आहे. अक्राळ विक्राळ स्वरुपात असणारी शिळा ही बहिरम बाबा म्हणून पुजली जाते. फार पूर्वी मध्य प्रदेशातील जंगलासह मेळघाटातील जंगलात राहणाऱ्या आदिवासींचं हे कुळदैवत असून कुळदैवताचा नवस फेडण्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात शेकडो बकरी आणि कोंबड्यांचा बळी दिला जायचा. पहाडावर असणाऱ्या मंदिराच्या पायऱ्यांवरून रक्ताचे पाट वाहायचे. कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी मंदिरात चालणारी बळी प्रथा बंद केली. यानंतर मंदिराच्या खाली जंगलात भरणाऱ्या यात्रेत उघड्यावर कोंबडा आणि बकऱ्यांचा बळी दिला जायचा. या प्रथेतूनच ही यात्रा मटण खाण्यासाठी प्रसिद्ध झाली. पुढे जिल्हा प्रशासनानं उघड्यावर मटण शिजवण्याऐवजी या ठिकाणी अनेकांना खास राहूटीची व्यवस्था करण्यास परवानगी दिली. या सोबतच हंडीत मटण शिजवणारी अनेक हॉटेल देखील या यात्रेत थाटण्यास सुरुवात झाल्याची माहिती, या यात्रेत सलग 40 वर्षांपासून हंडी मटणाचे हॉटेल लावणारे शाम मोहोड यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली.
मातीच्या हंडीतील मटणाचं वैशिष्ट्य : मातीच्या भांड्यात बनवलेलं जेवण हे स्वादिष्ट आणि पौष्टिक असतं. बहिरमच्या परिसरात विदर्भातील सर्वात गोड पाणी उपलब्ध असून या पाण्यानं बनवलेला स्वयंपाक अतिशय चवदार होतो. इथल्या पाण्याच्या गोडीमुळंच या यात्रेत मातीच्या हंडीत शिजवलेल्या मटणाला अतिशय उत्तम चव येते अशी माहिती श्याम मोहोड यांनी दिली. या यात्रेत खवय्ये स्वतः मटण घेऊन या ठिकाणी जिल्हा परिषदेनं निश्चित करून दिलेल्या जागेत कापडानी उभारलेल्या हॉटेलमध्ये शिजवण्यासाठी येतात तर अनेकदा हॉटेलवाल्यांकडूनच मटण घेतात. इथल्या ह्या कापडी हॉटेलमध्ये बसण्याची व्यवस्था असून काही हौशी लोक हॉटेलमध्ये बनवून घेतलेलं मटण लगतच्या जंगलात नेऊन त्यावर ताव मारतात असं देखील शाम राठोड यांनी सांगितलं.
गुजरातमधून येतात मातीची काळी हंडी : बहिरमच्या यात्रेत मोठ्या संख्येनं दुकानं ही मातीच्या हंडींनी सजली आहेत. लगतच असणाऱ्या मध्य प्रदेशातील बैतूल तालुक्यातील माती काम करणारी मंडळी यांची ही दुकानं असून त्यांच्याकडं लाल मातीत बनवलेली हंडी यासह मातीचं इतर साहित्य विकायला आहे. गत काही वर्षांपासून काळ्या मातीच्या भांड्यांना मागणी वाढली आहे. काळ्या मातीची भांडी गुजरातमधून आम्ही आणतो अशी माहिती, बैतूल जिल्ह्यात असणाऱ्या राणीपूर येथील रहिवासी नमन प्रजापती यांनी दिली. आमच्या घरात वडिलांनी आणि मी तयार केलेल्या लाल मातीची हंडी आणि इतर मातीचे साहित्य यात्रेत विकायला आणलं आहे. काळ्या रंगाची हंडी मात्र गुजरातमधील छोटा उदयपूर तालुक्यातून आणली जातात. मध्य प्रदेशातील व्यापारी गुजरातमधून अनेक ट्रक या काळ्या हंडीनी भरून आणतात. यात्रेत आम्ही दोन ट्रक काळी हंडी विकायला आणली असून इतरांनी मात्र पाच ते दहा ट्रक काळी हंडी यात्रेत उतरवली असल्याची माहिती, नमन प्रजापती यांनी दिली. एक किलो मटणासाठी 120 रुपयाला या यात्रेत हंडी मिळते तर अर्धा किलो मटण शिजवण्याकरिताची हंडी ही साठ रुपयाला विकली जाते.
घरात मातीच्या हंडीचं वाढलं फॅड : बहिरमच्या यात्रेत मिळणारी मातीची हंडी ही संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध झाली असून या यात्रेतून ही हंडी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. आज अनेकांच्या घरात मातीच्या हंडीत मटण शिजवण्याचं फॅड वाढलं आहे. ही हंडी चुलीवर ठेवून त्यावर मटण शिजवण्याची मजा असली तरी अनेक जण गॅस शेगडीवर ठेवून देखील या मातीच्या हंडीत मटण शिजवतात. आम्ही खास हंडीसाठीच यात्रेत आलो असं अनेकांनी "ईटीव्ही भारत" शी बोलताना सांगितलं.
हेही वाचा -