प्रतिकिया देताना प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे मुंबई Lok Sabha Election 2024:लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यास आता काही दिवसांचा अवधी राहिला असताना, महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांच्यातील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. अशातच महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीची साथ भेटणं फार महत्त्वाचं आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि २०१९ लोकसभा निवडणुकीत राज्यात राहिलेला वंचितचा प्रभाव याचा विचार करता यंदा महाविकास आघाडी वंचित बहुजन विकास आघाडीसोबत दे टाळी करण्याच्या प्रयत्नात आहे.
महाविकास आघाडीकडून वंचितसाठी रेड कार्पेट: राज्यात झालेले नाट्यमय सत्तांतर आणि न भूतो न भविष्यतो अशी झालेली राजकीय समीकरणं अशा परिस्थितीमध्ये अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलीय. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश व्हायलाच हवा अशी आग्रही भूमिका खासदार संजय राऊत यांनी सुरुवाती पासूनच घेतलीय. काँग्रेस तसेच शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे सुद्धा वंचितला महाविकास आघाडीत घेण्यास सकारात्मक आहेत. परंतु वंचित बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे अद्याप जागावाटपाच्या मुद्द्यावर अडून बसल्यानं जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. कारण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम बरोबर वंचितनं युती केली आणि या युतीचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तसेच शिवसेनेलाही फार मोठ्या प्रमाणामध्ये बसला. आताच्या घडीला भाजपाचा पराभव करणं हे एक मात्र उद्दिष्ट प्रकाश आंबेडकर यांनी समोर ठेवल्या कारणानं जागा वाटपात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जास्त तानाताण करू नये अशी त्यांची भूमिका आहे.
अनेकांना बसला फटका : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांच्या युतीनं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची पारंपरिक मत फोडण्यामध्ये बऱ्यापैकी यश संपादन केलं होतं. आताच पक्षांतर करून भाजपावासी झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, नांदेडचे अशोक चव्हाण यांचा पराभव करण्यात वंचित बहुजन आघाडीचा फार मोठा वाटा होता. सोलापूरमध्ये काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे यांचा पराभव करण्यातही वंचितची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. २०१९ च्या निवडणुकीत वंचित ही भाजपाची बी टीम आहे, असा आरोपही त्या दरम्यान करण्यात आला होता. नांदेड, सोलापूर, परभणी, सांगली, गडचिरोली, बुलढाणा, चिमूर, हातकणंगले या आठ मतदारसंघात काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. या मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा जास्त मत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली होती.
भाजपाचा सत्तेवरून पायउतार करणं एकच ध्येय: वंचित बहुजन आघाडीची सध्याच्या भूमिकेबाबत बोलताना वंचितचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे म्हणाले की, महाराष्ट्रात वंचित समूहाच राजकारण उभ करत असताना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जे काही चार कलमी कार्यक्रम त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या समूहाच्या संदर्भामध्ये ज्या काही मागण्या आहेत. त्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र विकास आघाडीला एक प्रस्ताव देण्यात आलेला आहे. त्यानुसार आमची अपेक्षा आहे की, या सर्व समूहाच्या बाबतीत सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन वंचित जी उभी आहे, त्यामध्ये आमचं प्राथमिक लक्ष आहे की, भाजपा आणि संघाच सरकार घालवणं. त्याचबरोबर समविचारी पक्षांना सोबत घेऊन महाराष्ट्राचं राजकारण उभ करताना सर्व समूहांना न्याय देणं ही भूमिका सुद्धा वंचित बहुजन आघाडीची आहे.
संघाने घेतला बहुजन आघाडीचा धसका :२०१९ ला जानेवारीमध्ये पक्ष रजिस्टर झाला होता आणि त्यानंतर मार्चमध्ये पक्षाला अधिकृत नोंदणी भेटली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जावं लागलं होतं. त्या दरम्यान पक्ष बांधणी आणि मोठी तयारी नसताना सुद्धा पक्षाला ४२ लाख मतं भेटली होती. २०१९ ते २०२४ या कार्यकाळात आजपर्यंत पक्षाने सर्व स्तरावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बांधणी केलीय. निवडणुकीसाठी जी बूथ वरची यंत्रणा असते ती सुद्धा पक्षाने निर्माण केली आहे. त्यामुळं महाराष्ट्रभर प्रकाश आंबेडकर यांच्या सभांना फार मोठा प्रतिसाद भेटत आहे. याकरता भाजपा आणि संघाने वंचित बहुजन आघाडीचा प्रचंड धसका घेतला आहे.
२०१९ मध्ये वंचितच्या उमेदवारीने अनेकांना बसला फटका :
1. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता. त्यांना ४ लाख ४६ हजार ६५८ मते भेटली होती. तर भाजपाचे विजयी उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना ४,८६,८९६ मते भेटली होती. तर तिसऱ्या नंबरवर राहिलेले वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांना १,६६,१९६ मतं मिळाली होती.
2. परभणीत शिवसेनेचे संजय जाधव हे विजयी झाले होते. त्यांना ५,३८,९४१ मतं मिळाली होती. तर वंचितचे आलमगीर खान हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले असून त्यांना १,४९,९४६ मतं मिळाली होती.
3. जालनामध्ये भाजपाचे रावसाहेब दानवे हे विजयी झाले होते आणि त्यांना ६,९८,०१९ मतं मिळाली होती. तर वंचितचे डॉक्टर सुभाष चंद्र वानखडे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले असून त्यांना ७७,१५८ मतं मिळाली होती.
4. नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे हे विजयी झाले होते. त्यांना ५,६३,५९९ मतं मिळाली होती. तर वंचितचे पवन पवार हे चौथ्या क्रमांकावर राहिले होते आणि त्यांना १,००,९८१ मतं मिळाली होती.
5. हिंगोली शिवसेनेचे हेमंत पाटील यांना ५,८६,३१२ मतं मिळाली तर तिसऱ्या नंबरवर राहिलेले वंचित आघाडीचे मोहन राठोड यांना १,७४,०५१ मतं मिळाली होती.
6. उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे उमराजे निंबाळकर यांना ५,९६,६४० मतं मिळाली होती. तर वंचितचे अरुण सलगर यांना ९८,५७९ मतं मिळाली होती.
7. सोलापूरमध्ये भाजपाचे जय सिद्धेश्वर स्वामी यांना ५,२४,९८५ मतं मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना ३,६६,३७७ मतं मिळाली तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले वंचितचे प्रकाश आंबेडकर यांना १,७०,००७ हजार मतं मिळाली होती.
8. सांगलीत भाजपाचे संजय पाटील यांना ५,०८,९९५ मतं मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले वंचितचे गोपीचंद पडळकर यांना ३,००,२३४ मतं मिळाली होती.
हेही वाचा -
- "फुटलेल्या पक्षांनी आधी आपली ताकद तपासावी", महाविकास आघाडीतील जागावाटपावरून प्रकाश आंबेडकर संतापले!
- महाविकास आघाडीत बैठकीचा ताळमेळ नाही, वंचित बहूजन आघाडी अनुपस्थित राहणार
- वंचितसह महाविकास आघाडीचं जागावाटप झालं, जरांगेंच्या उमेदवारीवर वंचितचा प्रस्ताव नाही - संजय राऊत