मुंबईLok Sabha election results 2024 : अठराव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या (4 जून) रोजी घोषित होणार असून संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडं लागलं आहे. अशात महाराष्ट्रातील ४८ जागांच्या निकालाकडं सुद्धा जनतेचं लक्ष लागलं असून महाराष्ट्रात सुद्धा महायुतीच्या ४० पेक्षा जास्त जागा जिंकून येतील असा विश्वास भाजपा नेत्यांना आहे.
महाराष्ट्रात भाजपाला सर्वाधिक जागा: देशात अबकी बार ४०० पार आणि राज्यामध्ये ४० पार हा नारा भाजपानं निवडणुकीपूर्वीच दिला होता. देशामध्ये सात टप्प्यात तर राज्यामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. एकंदरीत निवडणुकीचं चित्र आणि एक्झिट पोलचे आकडे यावर नजर टाकली तर महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. तरीही महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या त्यातल्या त्यात भाजपाच्या सर्वात जास्त जागा जिंकून येतील असा विश्वास भाजपा नेत्यांना असल्यानं दक्षिण मुंबईमध्ये भाजपाचे माजी आमदार, अतुल शाह यांनी १० हजार लाडू बनवण्याची तयारी केलीय.
दहा हजार शुद्ध तुपाचे लाडू : याप्रसंगी बोलताना अतुल शाह म्हणाले की, ज्या पद्धतीचं जन समर्थन आणि लोकांचा आशीर्वाद या निवडणुकीमध्ये आम्हाला लाभला आहे. यामुळं आम्ही प्रचंड मताधिक्यानं विजयी होऊ असा विश्वास आम्हाला आहे. सन २०१४, २०१९ मध्ये सुद्धा अशा पद्धतीचं लाडू बनवण्यात आले होते. आता तिसऱ्यांदा २०२४ मध्ये दहा हजार शुद्ध तुपाचे लाडू बनवण्यात येत आहेत. मागील १० वर्षांमध्ये मोदीजींनी जनतेसाठी प्रचंड काम केलं आहे. मोदी यांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहे.