नागपूर : नितेश राणेंनी बुरखा घालून परीक्षा देण्यावर आक्षेप घेत शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र लिहिलं. राज्यातील दहावी आणि बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कॉपीचं प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली. राणे यांच्या आक्षेपावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली.
धार्मिक तेढ निर्माण केला जातोय : "विषारी विचार पेरल्याशिवाय भाजपाचं कमळ फुलू शकत नाही, त्यासाठी त्यांनी एक स्पेशल फोर्स तयार केला. त्यांच्यामार्फत असे विचार पेरले जातात आणि त्या भरवशावर धार्मिक तेढ निर्माण केला जात आहे. तसेच त्या फोर्सचे नितेश राणे हे प्रमुख आहेत," असं माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
बीडच्या जनतेशी प्रामाणिक आहात हे सिद्ध करा : "बीड जिल्ह्यात ज्यांनी अनैतिक कामे केली, त्यांच्यावर आधी मकोका लावा. त्यांच्या सत्तेतील आमदारांनी जिल्हा नियोजन समितीमधून काम न करता 70 कोटी रुपयांची बोगस बिले काढल्याचा आरोप केला. बीड जिल्ह्यात भ्रष्टाचाराची किती मोठी यादी आहे, हे समोर आलं आहे. त्यामुळं बीड जिल्ह्याला स्वच्छ करायचं असेल तर, नुसतं बोलून होणार नाही, त्यासाठी कृती करावी लागेल. त्याची सुरुवात धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन करावी लागेल", असा सल्ला विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांना दिला. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला, तरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बोलण्याला अर्थ राहील, बीड जिल्ह्यातील जनतेशी ते प्रामाणिक आहे हे दाखवता येईल," असंही वडेट्टीवार म्हणाले.
निवडणुकांसाठी आम्ही तयार पण... : "सत्ताधाऱ्यांबद्दल लोकांच्या मनात अजूनही राग आणि चीड आहे. कुठेही नवीन मंत्र्यांचं स्वागत झालं नाही. कारण हे सरकार लोकांच्या मनाचे सरकार नाही. त्यामुळं जनता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्ताधाऱ्यांची जिरवण्यासाठी वाट पाहत आहे. म्हणून कोर्टात तारीख पे तारीख असा खेळ सुरू आहे. हे सर्व सत्तेच्या जोरावर सुरू आहे. का कोर्टाचा निकाल लागत नाही?, ओबीसी आरक्षणाचा तिढा का सुटत नाही?, याचं उत्तर सरकारने द्यावं. निवडणुका झाल्या तर आम्ही तयार आहोत. मात्र, आमच्या हक्कांच्या ओबीसींच्या जागा मिळाल्याशिवाय निवडणूक घेता कामा नये," असं वडेट्टीवार म्हणाले.
वैचारिक लढाई आहे, वैयक्तिक लढाई मानू नये : मंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची लग्न सोहळ्यात भेट झाली. हशी खुशीच्या वातावरणात त्यांची भेट झाली. यावर विजय वडेट्टीवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "आता लग्नात चाकू, पिस्तूल घेऊन जायला पाहिजे का? आणि दिसलं की पिस्तूल घेऊन एकमेकांच्या शेजारी बसलं पाहिजे का? भेटल्यावर एकमेकांसोबत बोलता कामा नये अशी तुमची भूमिका आहे का?. लग्न सोहळ्यात, चांगल्या कार्यक्रमात, उत्सवात एकमेकांशी भेटले तर संवाद होतोच. ही वैचारिक लढाई आहे, वैयक्तिक लढाई मानू नये."
हेही वाचा -