ठाणे Bhiwandi Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भिवंडी मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटानं राष्ट्रवादीचे भिवंडी लोकसभा प्रभारी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना गुरुवारी (4 एप्रिल) उमेदवारी जाहीर केली आहे. सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर होताच भिवंडीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केल्याचं पाहायला मिळाला.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाचे खासदार कपील पाटील यांना याआधीच महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून भिवंडी लोकसभेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रस्सीखेच सुरू होती. अखेर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भिवंडी लोकसभेसाठी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सुरेश म्हात्रे विरुद्ध कपील पाटील : सुरेश म्हात्रे यांनी 2009 मध्ये शिवसेनेकडून भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. 2014 मध्ये त्यांनी मनसे तर्फे भिवंडी लोकसभेची निवडणूक लढली होती, ज्यात कपील पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर म्हात्रे यांनी मनसेला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा शिवसेनेत प्रवेश करून ते ठाणे जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय झाले. 2021 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भिवंडीच्या राजकारणात भाजपाचे विद्यमान खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील आणि सुरेश म्हात्रे यांचं राजकीय वैर आहे. विकासाच्या मुद्द्यावरून हे दोघे नेहमी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळतं.
उमेदवारी मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया : भिवंडीतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना सुरेश म्हात्रे म्हणाले की, "महाविकास आघाडीच्या सर्व पक्षीय नेत्यांबरोबरच आदरणीय शरदचंद्र पवारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय, त्या विश्वासाला कुठंही तडा न जाता मी भाजपाच्या उमेदवाराचा निश्चितच पराभव करून दाखवेन. तसंच भिवंडी लोकसभा मतदार संघातील प्रश्न सोडवून खऱ्या अर्थानं जनतेची सेवा करू,असंही ते म्हणाले.
हेही वाचा -
- भटक्या विमुक्त जमाती संघटना, धनगर समाज, वंजारी समाजाच्यावतीने मविआ उमेदवारांना पाठिंबा, लक्ष्मण माने यांची घोषणा - Lok Sabha Election 2024
- माढा लोकसभा मतदारसंघातून मविआ कोणाला मैदानात उतरवणार? दिवंगत गणपत देशमुखांच्या शिष्याचं नाव चर्चेत - Lok Sabha Elections
- लोकसभा निवडणूक 2024 : मतदान जागृतीसाठी आता निवडणूक आयोग घेणार अंगणवाडी सेविकांचा आधार - Lok Sabha Election 2024