मुंबई Lok Sabha Election : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. आरोप प्रत्यारोपमुळं राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. राज्यातील चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे बहीण, मुलगा आणि सुनबाई यांना निवडून आणण्यासाठी भाऊ, बाप आणि सासरा या नात्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवरुन विरोधकांवर हल्लाबोल केला होता. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांकडून नात्यातच लोकसभा उमेदवारी दिल्याचं पाहायला मिळतंय. आज होत असलेल्या निवडणुकीत नात्यांची कसोटी पणाला लागलीय. यात राधाकृष्ण विखे पाटील, एकनाथ खडसे, डॉ. विजयकुमार गावित, माजी मंत्री के सी पाडवी आणि धनंजय मुंडे या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखेंची प्रतिष्ठा पणाला : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाकडं हाय व्होल्टेज लढत म्हणून पाहिलं जातंय. महायुतीकडून भाजपाचे सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्यात लढत होत आहे. सुजय विखे पाटील हे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली संपूर्ण ताकद सुजयच्या पाठीमागं उभी केलीय. मतदार संघात सर्व विरोधकांनी एकत्र येऊन राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान दिलंय. त्यामुळं सुजय विखे यांना निवडून आणण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली पूर्ण राजकीय शक्ती पणाला लावलीय.
बहिणीसाठी भावाची प्रतिष्ठा पणाला : बीड लोकसभा मतदारसंघात भाजपानं विद्यमान खासदार प्रतिम मुंडे यांचं तिकीट कापून त्यांच्या भगिनी भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना महायुतीकडून तिकीट दिलंय. पंकजा मुंडे यांची महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्याविरुद्ध लढत होणार आहे. पंकजा मुंडे या भाजपा ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या चुलत बहीण आहेत. मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा आशा प्रकारची लढत होत आहे. 2019 साली प्रीतम मुंडे यांना बजरंग सोनवणे यांनी चांगलीच टक्कर दिली होती. मात्र त्यावेळेस मंत्री धनंजय मुंडे हे प्रीतम मुंडेंविरोधात होते. आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आल्यामुळं पंकजा मुंडे यांच्यासाठी लढत काहींशी सोपी झाल्याचं बोललं जातंय. मतदार संघात मराठा विरुद्ध ओबीसी रंग दिल्या गेल्यामुळं धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
कुठं भाऊ, कुठं सासरा, कुठं बाप; लोकसभा निवडणुकीत नेत्यांपेक्षा जास्त नात्यांची प्रतिष्ठा पणाला - Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज अकरा लोकसभा मतदार संघात मतदान पार पडतंय. मात्र या निवडणुकीत नेत्यांसह नात्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
Published : May 13, 2024, 4:26 PM IST
सुनेसाठी सासऱ्याची प्रयत्नांची पराकाष्ठा : रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा संधी दिलीय. रक्षा खडसे या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई आहेत. एकनाथ खडसे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात असल्यामुळं मतदार संघात चुरस वाढली होती. मात्र, ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपात प्रवेश करण्याबाबत जाहीर केल्यामुळं चुरशीच्या लढाईची हवाच निघून गेलीय. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीराम पाटील यांची थेट लढत रक्षा खडसे यांच्या सोबत होत आहे. खरं तर रावेर मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपाचा गड राखण्यासाठी आणि सून रक्षा खडसे यांना निवडून आणण्यासाठी सासरे एकनाथ खडसे प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.
कोणाचा 'बाप' ठरणार ग्रेट : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राज्याचे माजी मंत्री काँग्रेस नेते के सी पाडवी यांचे चिरंजीव गोवाल पाडवी यांची लढत महायुतीकडून भाजपाचे नेते विजयकुमार गावित यांच्या कन्या हिना गावित यांच्याविरोधात होत आहे. नंदुरबार मतदारसंघ कायमच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. मात्र गेल्या दोन निवडणुकांमध्ये विजयकुमार गावित यांनी काँग्रेस पक्षाला खिंडार पाडली आणि दोन वेळा हिना गावित यांना भाजपाच्या तिकिटावर निवडून आणलंय. गेल्या वेळी हिना गावित यांनी के सी पाडवी यांना धोबीपछाड दिला होता. याचा वचपा गोवाल पाडवी काढणार का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. मुलाला निवडून आणण्यासाठी के सी पाडवी यांनीही जीवाचं रान केलंय. तर मुलीला तिसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी विजयकुमार गावित यांनी जोरदार तयारी केलीय. त्यामुळं लोकसभेच्या रणसंग्रामात कोणाचा 'बाप' ग्रेट ठरेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
भाजपा घराणेशाहीयुक्त झालाय - हेमंत देसाई : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्यानं गेल्या दोन वर्षांपासून भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर हल्लाबोल केलाय. विरोधकांनाकडून सगळ्याच राज्यतील भाजपातील घराणेशाहीवर कोणी बोललं तर त्याला देखील जोरदार उत्तर दिलंय. त्यांच्या म्हण्यानुसार काँग्रेस पक्षच परिवारवाद आहे. नेहरु- गांधी कुटुंबाची सत्ता ज्याप्रकारे काँग्रेस पक्षावर आहे. तशा प्रकारची सत्ता भाजपा पक्षात नाही, अशा प्रकारचं तत्व त्यांनी अधोरेखित केलंय. आमच्याकडं येणाऱ्या अनेक नेत्यांची मुलं जरी राजकारणात आली असेल तर त्यांना आम्ही रोखलं नाही, त्यांना त्यांचा विकास करण्याचा अधिकार आहे. या तत्त्वाचा विचार जर केला त्यांनी त्यांच्या पक्षात एक उमेदवार देण्यापेक्षा दोन दोन जणांना उमेदवारी दिलीय. महाराष्ट्राचा विचार केला तर अजित पवार उपमुख्यमंत्री असून सुनेत्रा पवार या खासदार होऊ शकतील. खडसे घराणं, मुंडे घराणं यांचा सामावेश आहे. काही मतदारसंघात घराणेशाहीच्या हातात अनेक वर्षांपासून सत्ता असलेलं कुटुंबच आपल्याकडं ओढून तो परिसर भाजपाच्या प्रभावाखाली आणायचा असा प्रयत्न आहे. बारामतीत आपल्याला प्रवेश करता येणार नाही, म्हणून भाजपानं शॉर्टकट मार्ग निवडला. त्याला युक्तिवाद म्हणून आमच्या पक्षाचं शीर्षनेतृत्व घराणेशाहीतून आलेलं नाही. यामुळं अनेक ठिकाणी भाजपात बंडखोरी आणि अस्वस्थता कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यांच्या पक्षात आणि त्यांच्यासोबत अन्य पक्षातील नेते आणि घराणेशाही आलीय. त्यामुळं अनेकांच्या संधी हुकल्या आहे. भाजपाच्या घराणेशाही नेस्तनाभूत करण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या धोरणापेक्षा इतर घराणेशाही पूर्ण भाजपात, सोबत आल्यानं घराणेशाही काँग्रेसपेक्षा अधिक असल्याचं पाहायला मिळतंय. पूर्वी काँग्रेस पक्ष घराणेशाहीयुक्त असायचा तसा आता भाजपा झालाय. देशातील भाजपासोबत असलेल्या मित्र पक्षांची देखील हीच अवस्था आहे. चौथ्या टप्यातील नात्यातील दिग्गज नेत्यांची कसोटी लागलीय. त्यामुळं भाजपाकडून घराणेशाहीला विरोध हे थोतांड आहे," असा आरोप राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी केलाय.
हेही वाचा :