महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

नादच खुळा! सहा वेळा पराभूत होऊनही लढण्याची उमेद असलेला 'बाप' उमेदवार - lok sabha election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election : निवडणुकीत पराभूत झाले तरीही अनेक निवडणुकांमध्ये पुन्हा उभे राहणारे अनेक अवलिया आपण प्रत्येक निवडणुकीत बघतो. असाच एक अवलिया पालघर जिल्ह्यातही आहे. तब्बल सहावेळा पराभूत होऊनही या उमेदवारानं अद्याप लढण्याची जिद्द सोडली नाही.

Lok Sabha Election
नादच खुळा! सहा वेळा पराभूत होऊनही लढण्याची उमेद असलेला 'बाप' उमेदवार

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 27, 2024, 9:10 AM IST


पालघर Lok Sabha Election 2024 : निवडणूक लढवण्याची अनेकांना इच्छा असते. काही हौसेसाठी निवडणूक लढवतात. काही फक्त निवडणुकीत भाग घेतात. काका धरतीपकड यांच्यापासून अनेक उमेदवार देशातील कोणतीही निवडणूक टाळत नाहीत. अशाच प्रकारचं पण एक वेगळं व्यक्तिमत्त्व म्हणून मोहन गुहे यांचा उल्लेख केला जातो. भारतीय आदिवासी पार्टीचे (BAP) अधिकृत उमेदवार म्हणून पालघर लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळालीय. तब्बल सहावेळा पराभूत होऊनही त्यांनी यावेळी आपली उमेदवारी दाखल केली आहे.

आतापर्यंत लढवल्या सहा निवडणूक : गेल्या सोळा वर्षात त्यांनी चार विधानसभा आणि दोन लोकसभा अशा सहा निवडणूक लढवल्या असल्या, तरी अजूनही त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती संपलेली नाही. लढलो नाही, तर जिंकणार कसा, ही त्यांची भावना असून जिंकत नाही, तोपर्यंत लढायचं या वृत्तीनं ते निवडणुकीच्या रिंगणात उतरत असतात. मोहन गुहे हे आदिवासी समाजातील आहेत. आदिवासी समाज कुणाचा गुलाम म्हणून राहू नये, त्यांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. रोजगार मिळाला पाहिजे, ही त्यांची तीव्र भावना आहे. केवळ भावना व्यक्त करुन, बोलून चालणार नाही, तर आदिवासींचा प्रतिनिधी विधिमंडळ किंवा संसदेत गेला पाहिजे, हा विचार घेऊन ते निवडणुकीच्या रिंगणात उतरत असतात.


जिद्द सोडायची नाही : 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना आठ हजार तर त्याच वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत साडेतेरा हजार मतं मिळाली होती. पहिल्यांदा वंचित बहुजन विकास आघाडीकडून ते निवडणुकीच्या रिंगणात होते. नंतरच्या निवडणुकीत त्यांना बहुजन समाज पक्षानं उमेदवारी दिली, परंतु पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाचे फारसे काम नसल्यानं तसंच हा पक्ष या भागासाठी नवीन असल्यानं या मतदारसंघात दुसऱ्यांदा उभे राहूनही मोहन गुहे यांच्या मतात घट झाली. पराभावानं नाउमेद व्हायचं नाही आणि जिद्द सोडायची नाही, ही गुहे यांची वृत्ती आहे.

लढू, पडू, लढत लढत जिंकू : लोकांच्या कल्याणासाठी संघर्ष केला पाहिजे. संघर्ष करताना लोकांची मतंही जिंकली पाहिजे. हा त्यांचा निवडणूक जिंकण्याचा कानमंत्र आहे. त्याच मार्गावर ते सध्या चालले आहेत. गुहे हे ठाणे येथील एका संस्थेत प्राथमिक शिक्षक आहेत. दरवेळी पगारातील थोडी थोडी रक्कम बाजुला काढून त्यातील काही रक्कम ते निवडणुकीसाठी वापरतात. दरवर्षातून लाख-सव्वा लाख रुपये बाजुला ठेवत ते असे पाच वर्षे रक्कम जमा करत निवडणुकीवर खर्च करण्यास पत्नी आणि कुटुंबीयांची त्यांना साथ असते. निवडणूक लढवण्याची इर्षा त्यांनी मुलींतही निर्माण केलीय. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून कोणतीतरी एक निवडणूक कधी तरी जिंकणारच, असा त्यांचा निर्धार आहे.

कशासाठी मैदानात ? : टीकेची पर्वा न करता निवडणुकीच्या रिंगणात ते कायम असतात. निवडणूक कशासाठी लढवायची, याचा एक कृती आराखडा त्यांच्या मनात कायम असतो. पालघर जिल्ह्यात पाच महत्त्वाची धरणं असली, तरी हा जिल्हा अजूनही तहानलेला आहे. दुर्गम, आदिवासी भागात आरोग्य सुविधा पोहोचत नाहीत. पत्नीच परिचारिका असल्यामुळं आरोग्याचं महत्त्व त्यांना चांगलंच समजते. त्याचबरोबर खेड्यापाड्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, त्यासाठी आदिवासींचा प्रतिनिधी संसद किंवा विधिमंडळात पाहिजे. म्हणजे प्रश्नांची जाण असलेला नेताच लोकांचे प्रश्न सोडवू शकेल, असं ते ठामपणे सांगतात.

एक एक सदस्य मेळवावा, आदिवासी परिवार वाढवावा : दरवेळेला निवडणूक आली, की नाशिक-डहाणू रेल्वेचा प्रश्न पुढं येतो. "पालघर जिल्ह्यातील रस्त्याचे प्रश्न चर्चिले जातात, परंतु निवडणुकीनंतर ते प्रश्न तसंच राहतात, असं न होता हे प्रश्न वारंवार मांडून त्याचा पाठपुरा करण्यासाठी लोकांनी निवडून दिलं पाहिजे," असं साकडं ते घालतात. "वाढवण बंदराचा प्रश्न स्थानिक मच्छीमार, शेतकरी आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विरोध करणारे आता वाढवण बंदराचे समर्थक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वाढवण बंदर आवश्यक का नाही, याचा राज्यकर्त्यांना पुराव्यानिशी प्रत्यय आणून द्यावा लागेल," असं गुहे सांगतात.

आदिवासी कला, संस्कृतीचा अभिमान : गुहे यांची भाषा ही ग्राम्य, आदिवासी आहे. आदिवासी संस्कृती कला जपली पाहिजे, या विचारावर ते ठाम आहेत आणि त्यासाठी आदिवासी प्रतिनिधी संसदेत, विधिमंडळात जायला हवा. केवळ या भावनेतूनच निवडणूक लढवत असल्याचे ते सांगतात. आपल्या निवडणुकीच्या ध्येयातून अन्य आदिवासी प्रेरणा घेऊन आदिवासींसाठी राखीव असलेल्या आदिवासी मतदारसंघातून निवडणूक लढवली पाहिजे, असा सल्ला ते आपल्या बांधवांना देतात. गुहे यांना आपल्या आर्थिक, सामाजिक आणि अन्य क्षमतांची जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे पारिवारिक सदस्य, मित्र, कौटुंबिक परिवारातील सदस्य, मार्गदर्शक, हितचिंतक, सल्लागार आणि समर्थक यांची एक यादी बनवली आहे. प्रत्येकाचा मोबाईल क्रमांक घेऊन परत त्यांच्याकडून त्यांच्या कुटुंबातील आणि नातेवाइक, मित्रांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधण्याचा नवा संकल्प त्यांनी केला आहे.

भारत आदिवासी पक्षातून लढणार : "आदिवासींसाठी असा कोणताही पक्ष नव्हता. परंतु, आता आदिवासींनी आदिवासींसाठी पक्ष काढलाय. भारत आदिवासी पक्ष (बाप) असं त्याचं नाव आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार आणि आता महाराष्ट्रात हा पक्ष आला आहे. ‘बाप’ला निवडून दिल्याशिवाय ‘आई’ कशी समजणार," असं ते विचारतात. आता या पक्षानं त्यांना उमेदवारी दिलीय.

हेही वाचा :

  1. लोकसभा निवडणूक 2024 : अकोल्यात मतदानाला शांततेत सुरुवात; सकाळच्या सत्रात 7 टक्के मतदान - Lok Sabha Election 2024
  2. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात; राज्यात 'या' जागांवर होणार मतदान - Lok Sabha Election
  3. नरेंद्र मोदी, राहुल गांधींनी केलं आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन? निवडणूक आयोगाची भाजपासह काँग्रेसला नोटीस - Lok Sabha Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details