पुणे : शहरात सध्या ‘पुणे पुस्तक महोत्सव’ (Pune Book Festival) सुरू असून त्याला पुणेकर भरभरून प्रतिसाद देत आहेत. पुण्यातील वाचकांसह इतर शहरातील वाचकही या पुस्तक महोत्सवला भेट देण्यासाठी आवर्जून गर्दी करताना दिसत आहेत. तर आज चक्क लावणी कलाकार गौतमी पाटीलनं या पुस्तक महोत्सवाला भेट दिली.
"नाचायला नव्हे तर पुस्तक वाचायला आली" : यावेळी गौतमी पाटील म्हणाली की, मी कधीही पुस्तक वाचलं नाही. कारण मला लहानपणापासूनच डान्सबद्दल आकर्षण होतं. तसंच माझ्या संघर्षाबाबत सर्वानाच माहिती आहे. मी नाचायला जात असते. आज मात्र मी नाचायला नाही तर इथं पुस्तक वाचायला आली आहे. या पुस्तक महोत्सवामध्ये येऊन मला खूप आनंद झाला. आतापर्यंत मी वाचनासाठी वेळ काढत नव्हते. पण आता रिकाम्या वेळेत वाचनाची ही चांगली सवय जोपासणार असल्याचं तिनं सांगितलं.
संविधानाची मूळ प्रत पाहिली : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे सुरू असलेल्या पुस्तक महोत्सवाला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध मान्यवर या महोत्सवला भेट देत आहेत. अशातच गौतमी पाटीलने महोत्सवामधील बुक स्टॉलला भेट दिली. यावेळी तिनं संविधानाची मूळ प्रत बघितली. त्यानंतर संयोजक राजेश पांडे यांनी गौतमी पाटीलला पुस्तक भेट देऊन तिचा सत्कार केला.
ती हातात पुस्तक घेऊन वाचताना दिसली : गौतमी पाटील सोशल मीडियावर ट्रेंडिंग लिस्टमध्ये असते. गौतमी ही डान्स कार्यक्रमाशिवाय अनेक ठिकाणी उपस्थित राहाते. आज पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे गौतमी पाटील आल्यावर ती याठिकाणी नाचणारा का? असं सर्वांना वाटलं होतं. पण नेहमीच नाचणारी गौतमी यावेळी हातात पुस्तक घेऊन वाचताना दिसली.
हेही वाचा -