ठाणे : कल्याण पश्चिमेतील हायप्रोफाईल आजमेरा सोसायटीत राहणाऱ्या मराठी कुटुंबावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुन्ह्यातील सहा जणांना खडकपाडा पोलिसांनी शनिवारी (21 डिसेंबर) न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं या प्रकरणातील मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला, त्यांची पत्नी गीता शुक्ला यांच्यासह एकूण सहा जणांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांकडून तपास सुरू : धीरज देशमुख, त्यांचा भाऊ अभिजित देशमुख, लता कळवीकट्टे या कुटुंबीयांना दहा जणांकडून धारदार शस्त्रानं हल्ला करत मारहाण करण्यात आली. एका प्ररप्रांतीय कुटुंबानं मराठी कुटुंबाला मारहाण केल्यामुळं हे प्रकरण चिघळलं. विधिमंडळातही या वादाचे पडसाद उमटले. उर्वरित चार जणांना अटक करण्यासाठी पोलिसांची चार पथकं विविध भागात तपास करत आहेत.
न्यायालय परिसरात पोलीस बंदोबस्त : दरम्यान, अनुचित प्रकार टाळण्यासाठी कल्याण न्यायालय परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शुक्रवारी (20 डिसेंबर) या प्रकरणातील मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला, सुमित जाधव, रंगा उर्फ दर्शन बोराडे यांना पोलिसांनी अटक केली होती. तर शुक्रवारी रात्री उशिरा गीता शुक्ला, पार्थ जाधव, विजय जाधव यांना खडकपाडा पोलिसांनी अटक केली.
फिर्यादीचे वकील हरीश सरोदे यांनी माध्यमांना सांगितलं की, धूप अगरबत्ती लावण्याच्या वादातून झालेल्या मारहाण प्रकरणात सहा जणांना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार, फरार आरोपींचा शोध घेणं याविषयावर ही कोठडी सुनावण्यात आली. कट करून हल्ला, अंबर दिवा वापर ही कलमं संबंधितांच्या गुन्ह्यात वाढविण्यात आली आहेत.
प्रकरण दोन शेजाऱ्यांमधील वादापुरतं : "या प्रकरणात सहा जणांना पोलीस कोठडी झाली. या प्रकरणाला नाहक मराठी, उत्तरभाषिक असा रंग देण्यात आला. हे प्रकरण दोन शेजाऱ्यांमधील वादापुरतं सीमित आहे. त्याला नाहक राजकीय लोक, पोलिसांकडून प्रांतवादाचा रंग देण्यात येत आहे. या प्रकरणात दोन प्राथमिक तपासणी अहवाल दाखल आहेत. या प्रकरणात कोणताही प्रांत वाद नाही," असं गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तींचे वकील अनिल पांडे यांनी सांगितलं.
हेही वाचा