पुणे Kothrud Assembly Election 2024 : राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. असं असताना पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आमदार असताना भाजपामध्ये रस्सीखेच सुरू झाली. शहर विकास समितीचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी देखील जोरदार तयारी सुरू केली. बालवडकर यांनी बालेवाडीत शक्तिप्रदर्शन करत कोथरूड विधानसभेतून इच्छुक असल्याचं स्पष्ट केलं.
कोथरूडमधून कोण इच्छुक? : कोथरूडमध्ये सध्या उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे विद्यमान आमदार आहेत. तरीही बालवडकर यांनी इच्छुक असणं गैर नसल्याचं म्हटलं आहे. पक्ष मला नक्कीच संधी देईन, असं म्हणत इलेक्टिव्ह मॅरिटच्या आधारावर पक्ष विचार करेल. परंतु, माझा विचार न केल्यास योग्य तो निर्णय घेईल, असं म्हणत बंडखोरीचा सूचक इशारा अमोल बालवडकर यांनी दिलाय. यानिमित्तानं कोथरूड विधानसभेत भाजपामध्ये कलह सुरू झाल्याचं बघायला मिळतंय.