मुंबई- राजकीय क्षेत्रातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येतेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलीय. राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील 'शिवतीर्थ' या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मोहित कंबोज उपस्थित होते. तर मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे हे उपस्थित होते. या दोन मोठ्या नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
मनसे भाजपासोबत जाणार...? : लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला होता, तर विधानसभा निवडणुकीत मनसेने निवडणूक लढवली होती. परंतु त्यांचा एकही आमदार निवडून आलेला नाही. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांची भेट महत्त्वाची मानली जातेय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार की महायुतीला पाठिंबा देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली असावी, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येतेय. तर दुसरीकडे राजपुत्र अमित ठाकरे यांना भाजपाच्या कोट्यातून विधान परिषदेवर पाठवले जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास एक ते सव्वा सात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
राज ठाकरेंच्या घरी ब्रेक फास्ट केलाय : दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज ठाकरेंची भेट कुठलीही राजकीय नव्हती. ही कौटुंबिक भेट होती. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा मला अभिनंदनचा फोन आला होता. तेव्हा मी म्हटलं होतं की, मी तुम्हाला भेटायला घरी येईन. त्यानंतर आज दादरमध्ये कार्यक्रम होता. त्याच्या आधी मी त्यांची घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे राजकीय भेट होती ही चर्चा फक्त माध्यमातून आहे. ही भेट कुठलीही राजकीय नव्हती. केवळ कौटुंबिक भेट होती. तसेच राज ठाकरेंच्या घरी मी ब्रेक फास्ट केला, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या भेटीवर माध्यमांशी बोलताना सांगितलंय.
ठाकरे-फडणवीस भेटीवर राऊतांची टीका : दरम्यान, राज ठाकरेंनी शिवाजी पार्कला एक कॅफे उघडलेलं आहे. एवढेच मला माहीत आहे. तिथे लोक सातत्याने चहापानला जात असतात आणि तो कॅफे सगळ्यांसाठी खुला आहे. ही एक चांगली गोष्ट आहे की, राजकारणामध्ये असं चहापान होत असतं. तो कॅफे चांगला असेल, असं मला वाटतं. लोकांनी तिकडे जावं तिथला नजारा पाहावा, असा टोला खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर लगावलाय.
कुठलीही राजकीय चर्चा बैठकीत नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट राजकीय नव्हती. कौटुंबिक होती, कुठलीही राजकीय चर्चा बैठकीत झाली नाही, असंही मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणालेत.
हेही वाचा-