मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज प्रसिद्ध स्टार अशोक सराफ यांनी मराठी आणि हिंदीमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ते आता देखील मराठी चित्रपटसृष्टीत खूप सक्रिय आहेत. अशोक मामांनी आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना आतापर्यंत दाखवली आहे. त्याचे असे अनेक चित्रपट आहे, जे खूप लोकप्रिय झाले आहेत. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी अनेकांना आवडायची. दोघेही एकत्र आले की, चित्रपट हा धमाकेदार असेल असे अनेकजण अंदाज लावत होते. आज आम्ही अशा काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही पाहून खळखळून हसू शकता. आम्ही तुम्हाला अशा काही पाच मराठी चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जे खूप कॉमेडी आहेत.
1 नवरा माझा नवसाचा : 2004मध्ये प्रदर्शित झालेला 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट खूप मजेशीर होता. या चित्रपटाला सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलं होतं. 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटाला मराठी चित्रपटसृष्टीतील एक कल्ट क्लासिक मानला जातो. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर आणि अशोक सराफ हे स्टार्स आहेत. या चित्रपटामध्ये एक जोडपे नवस पूर्ण करण्यासाठी मुंबई ते गणपतीपुळे असा प्रवास करताना दाखवतात, वाटेत त्यांना कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतो, याबद्दल मजेशीर पद्धतीनं मांडण्यात आलं आहे. तसेच या चित्रपटाचा सीक्वेल 'नवरा माझा नवसाचा 2' 20 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट देखील अनेकांना आवडला होता.
2 अशी ही बनवा बनवी : अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे स्टारर 'अशी ही बनवा बनवी' हा चित्रपट खूप मजेशीर आहे. या चित्रपटाची कहाणी दोन भावांची आहे, ज्यांना त्यांच्या दोन मित्रांना पत्नी म्हणून दाखवावे लागते, कारण त्यांचे घरमालक फक्त विवाहित जोडप्यांना रुम देणार असतात. जेव्हा हे दोन भाऊ आपल्या खोट्या पत्नीसह या घरात राहात असतात, तेव्हा खरी धमाल सुरू होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन सचिन पिळगावकरनं केलंय.
3 शेजारी शेजारी : अमोल प्रोडक्शन्सचा 'शेजारी शेजारी' या चित्रपटाचे दिग्दर्शन दिलीप कोल्हटकर यांनी केलं आहे. 'शेजारी शेजारी' चित्रपटाचे निर्माते सचिन पारेकर आणि संजय पारेकर हे आहेत. 1990मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट खूप मजेशीर आहे. या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, निशिगंधा वाड आणि वर्षा उसगावकर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले आहेत. हा चित्रपट 1964च्या अमेरिकन चित्रपट 'गुड नेबर सॅम'वर आधारित होता. यानंतर 2005मध्ये 'सुख' या नावाने हिंदीमध्ये त्याचा पुनर्निर्मिती करण्यात आली. 'शेजारी शेजारी' चित्रपटामध्ये प्रीती (वर्षा उसगावकर) हिचा असा चुकीचा समज आहे की, तिचा राजेश देशपांडे (लक्ष्मीकांत बेर्डे)चं विवाहबाह्य संबंध आहेत. या संशयामुळे दोघेही घटस्फोटासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर प्रीती तिची बालपणीची मैत्रीण सुशीला (निशिगंधा वाड) जी गृहिणी , तिच्या घराजवळ राहण्यासाठी जाते. सुशीलाचा पती केशव कुलकर्णी (अशोक सराफ) हा एका जाहिरात कंपनीत काम करत असतो. यानंतर प्रीतीला कळते की, तिच्या दिवंगत आजोबांनी त्यांच्या मृत्युपत्राद्वारे तिला 25 लाख रुपये मोठी रक्कम हस्तांतरित केली आहे, मात्र यात एक अट असते, ही अट काय आहे, याबद्दल जाणून घेण्यासाठी हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.
4 फेका फेकी : 1989मध्ये प्रदर्शित झालेला मराठी भाषेतील चित्रपट हा खूप मजेशीर आहे. या चित्रपटाची कहाणी मूलराज राजदा यांनी लिहिली आहे. हा चित्रपट, बिपिन वरती यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अशोक सराफ, निवेदिता जोशी सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सविता प्रभुणे, प्रतिभा गोरेगावकर, चेतन दळवी आणि अजय वाधवकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदीमध्ये 'गोलमाल रिटर्न्स' या नावानं रिमेक करण्यात आला होता.
![Ayatya Gharat Ghroba](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10-02-2025/23511792_1.jpg)
5 आयत्या घरात घरोबा : 'आयत्या घरात घरोबा' चित्रपट 1991मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केलंय. यात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे,सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर आणि किशोरी शहाणे यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाची कहाणी देखील खूप मजेशीर आहे.