कोल्हापूर : राज्यातील सर्वाधिक मतदान झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीनं महाविकास आघाडीला धोबीपछाड दिल्याचं निकालावरून स्पष्ट झालं. जिल्ह्यातील सर्वच दहा जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी घेतलेलं मताधिक्य पाहता लाडक्या बहिणींनी महायुतीला मतपेटीतून भरभरून मताचं दान दिलं. महाविकास आघाडीला जिल्ह्यातील एकही जागा जिंकता आली नाही. यामुळं महाविकास आघाडीचा गड असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची अवस्था 9-0 अशी झाली आहे. चंदगडच्या एका जागेवर अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी बाजी मारली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याची राजकीय ताकद: पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची राजकीय ताकद राज्यभरात मोठी आहेत. सहकारावर चालणाऱ्या या राजकारणात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत इथल्या जनतेनं कायमच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पाठ राखण केली होती. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या महायुतीनं जिल्ह्यातील महाविकास आघाडीला क्लीन स्वीप देत 9-0 असा विजय मिळविला आहे.
चंदगडमध्ये अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांची बाजी :आमदार सतेज पाटील यांचे पुतणे आणि काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील, काँग्रेसचे दिवंगत आमदार पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील, शिरोळमधून गणपतराव पाटील, हातकणंगले मधून राजू आवळे यांचाही पराभव झाला. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील विरुद्ध महाडिक कुटुंब अशी कट्टर राजकीय स्पर्धकांमध्ये लढत झाली. या लढतीत महाडिक यांनी बाजी मारत ऋतुराज पाटील यांचा दारुण पराभव केला. तर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षानं दोन जागा राखत अस्तित्व सिद्ध केलं. स्थानिक शाहू आघाडीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही शिरोळ मतदारसंघातून विजय संपादन केला. तर चंदगडमध्ये अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी बाजी मारली.
लक्षवेधी कागलच्या रणांगणात मुश्रीफांचा षटकार: राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाचे (एसपी) उमेदवार समरजित घाटगे विरुद्ध राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ अशी लक्षवेधी लढत झाली. 26 फेऱ्यांमध्ये प्रत्येक फेरीत उत्कंठावर्धक मताधिक्य राखत हसन मुश्रीफ यांनी 26 व्या फेरी अखेर 12 हजार 33 मतांनी विजय मिळवला. तर ते सहाव्यांदा कागलचे आमदार म्हणून ते विधीमंडळात प्रतिनिधित्व करणार आहेत.
दक्षिणचं वारं फिरलं आणि अमल महाडिक दुसऱ्यांदा विजयी: ग्रामीण आणि शहरी असा विभागला गेलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात महाडिक विरुद्ध पाटील अशा लढतीत यंदा हिंदुत्ववादी मते भारतीय जनता वळाल्यानं अमल महाडिक यांना विजय मिळाला. मतदार संघातील प्रलंबित राहिलेल्या पायाभूत सोयीसुविधा पूर्णत्वास नेणार असल्याचे दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार अमल महाडिक यांनी सांगितलं.