मुंबई Jayant Patil on NCP Dispute : केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलंय. यानंतर चांगलंच राजकारण तापलं असून यावरुन अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिलीय. "निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं असलं तरी जिथं शरद पवार आहेत, तिथं खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळं आता नव्या जोमानं कामाला लागण्याचा निर्धार आम्ही केलाय आणि आम्हीच विजयी होऊ असा आम्हाला विश्वास आहे," असा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय.
असं होईल याची कल्पना होतीच : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना जयंत पाटील म्हणाले, "केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णय अत्यंत अन्यायकारक आहे. आयोगाचा निकाल आल्यापासून प्रत्येक कार्यकर्ता या निर्णयाच्या विरोधात आपली भावना व्यक्त करत आहे. परंतु, एकूण निवडणूक आयोगाची कार्यपद्धती पाहिली तर असं काहीतरी विपरीत होईल याची पुसटशी कल्पना आम्हाला होतीच. परंतु प्रदेशाध्यक्ष म्हणून मला हे आधी सांगितले पाहिजे की हा निर्णय जरी अपेक्षित असला तरी, आम्ही यानं घाबरुन जाणार नाही. कारण 1999 पूर्वी लोकांना फक्त शरद पवार माहित होते. त्यामुळं निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाचा आमच्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही."
जिथे पवार तिथे पक्ष : यानंतर बोलताना जयंत पाटील म्हणाले, "शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्यामुळे जिथे शरद पवार आहेत तिथेच पक्ष आहे. शरद पवार ज्या बाजूला उभे राहतील त्या बाजूचा विजय होणार हे निश्चित. त्यामुळं कार्यकर्त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्हाची भीती बाळगण्याचं कारण नाही. लोक आपल्यापेक्षा खूप पुढं गेलेले आहेत. ते पक्षाचे चिन्ह आणि नाव कुणाचे हे चटकन ओळखतात त्यामुळं आता चिन्हाची भीती बाळगू नका. 1999 मध्ये जेव्हा आम्ही घड्याळ चिन्ह घेतलं तेव्हा मला हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचेल का अशी भीती वाटत होती. त्यामुळं मी लहान मुलांना घड्याळाचे प्लास्टिकचे बिल्ले छापून देत होतो. ती मुलं हे बिल्ले घेऊन घरोघरी नेऊन देत होते. पण आता लोक आपल्यापेक्षा फार पुढे गेले आहेत. लोक चिन्ह ओळखतात तसंच नाव कुणाचं आहे हे सुद्धा त्यांना चांगलं ठाऊक आहे. त्यामुळं आता नव्या चिन्हांची भीती बाळगण्याची काहीच गरज नाही ते लोकांपर्यंत आपोआप पोहोचेल."