कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून सर्वांच लक्ष लागलेल्या राज्यातील विधानसभेची निवडणूक अखेर जाहीर झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार. निवडणुकीची घोषणा होताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुतीला टोला लगावला.
एकाच टप्प्यात कार्यक्रम करणार : "महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला एकत्र सामोरे जाणार. महायुतीचं सरकार घाबरलंय. महायुतीनं पाहिजे त्या घोषणा करून पुन्हा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, हे राज्यातील जनतेला कळून चुकलेलं आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा विजय होणार आहे. राज्यात एका टप्प्यात निवडणूक होत आहे. त्यामुळं आम्ही महायुतीचा एकाच टप्प्यात कार्यक्रम करणार," असा इशाराच जयंत पाटील यांनी महायुतीला दिला. कोल्हापुरातील इचलकरंजीत ते पत्रकारांशी बोलत होते.
लाडकी बहीण योजनेला विरोध नाही :जयंत पाटील यांनी यावेळी लाडकी बहिण योजनेवरूनही सरकारच्या निशाणा साधला. "आमचा लाडकी बहीण योजनेला विरोध नाही. उलट आम्ही राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर बहिणींना महायुतीनं दिलेल्या लाभापेक्षा जास्त लाभ कसा देता येईल, यासाठी उपाययोजना करण्याचं काम करणार आहोत," असंही जयंत पाटील यांनी म्हटलं.