अमरावती : अनाथांची माय अशी ओळख असणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त 'तृतीय पुष्प शब्दांजली महोत्सव' त्यांनी स्थापन केलेल्या सावित्रीबाई फुले आश्रम शाळेच्या आवारात आयोजित करण्यात आला. यावेळी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह माईंवर प्रेम करणाऱ्या अनेकांच्या उपस्थितीत माईंच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. महाराष्ट्राचे सेवानिवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. टी. एस. भाल यांनी यावेळी सिंधुताई सपकाळ यांच्यासोबतच्या विशेष आठवणी सांगितल्या.
1978 पासून माईंचा संपर्क : यावेळी बोलताना डॉ. टी. एस. भाल म्हणाले की, "सिंधुताई सपकाळ यांचं महत्त्वपूर्ण सानिध्य मला 1978 पासून लाभलं. विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी घेतल्यावर वर्धा येथे मी नोकरीवर असताना त्यावेळी भजन गाणाऱ्या सिंधुताई यांच्याशी ओळख झाली. पुढे मी पोलीस खात्यात रुजू झाल्यावर जळगावला असताना त्या भागात सिंधुताई सपकाळ यांचं सामाजिक कार्य पहिल्यांदा सर्वांसमोर आलं. 1991 मध्ये मी अमरावतीत पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालो. त्यावेळी सिंधुताई सपकाळ यांचा मेळघाटात चुरणी परिसरात गवळी बांधवांच्या हक्कासाठी व्याघ्र प्रकल्पासोबत संघर्ष सुरू होता. यानंतर पुढं त्यांचं महान सामाजिक कार्य उंच शिखरावर जाऊन पोहोचलं. समाजाला मोठा दिलासा देण्याचं कार्य करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत मला त्यांचं सानिध्य लाभलं. यासाठी मी स्वतःला पुण्यवान समजतो", अशी भावना भाल यांनी व्यक्त केली.
चिखलदरा येथे पहिलं आश्रम : "सिंधुताई सपकाळ यांनी चिखलदरा येथे 1992 मध्ये निराधार मुलींसाठी सावित्रीबाई फुले यांच्या नावानं पहिलं आश्रम सुरू केलं. आज या आश्रम शाळेत 60 ते 70 मुलींना उज्वल भविष्यासाठी नवी दिशा मिळत आहे. चिखलदरा येथील या अनाथ आश्रमाची जबाबदारी मुलगा म्हणून माईंनी माझ्यावर सोपवली. मात्र, माईंचा वारस म्हणून नव्हे तर अनाथ मुलांसोबत एकरूप होऊन मी वाढलोय. त्यामुळं या अनाथ आश्रममधील मुलांनादेखील मी माईंसारखंच जिव्हाळ्यानं जपतोय", असं सिंधुताई सपकाळ यांचे पुत्र अरुण सपकाळ म्हणाले. तसंच आश्रम शाळेतील मुलं स्वतःच्या पायावर उभे राहावेत, यासाठी आम्ही त्यांना मदत करतो. या कार्यासाठी समाजातील अनेक घटकांकडून मदत मिळते. भविष्यात देखील लोकांकडून मदत मिळेलच, अशी अपेक्षा देखील अरुण सपकाळ यांनी व्यक्त केली.
चौथा वर्गांत शिकलेल्या माईंना 25 देशात मिळाला मान : "सिंधुताई सपकाळ या केवळ चौथ्या वर्गापर्यंत शाळेत गेल्या होत्या. फार कमी शिकलेल्या आमच्या माईंना 25 देशात जाण्याचा योग आला आणि या सर्व देशांमध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला. माईंच्या जिभेवर सरस्वती वास करत होती. यामुळंच त्या भाषणासाठी कोणत्याही देशात उभ्या राहिल्या, त्यावेळी ही बाई काय बोलणार? असं उपस्थितांना वाटायचं. मात्र, माईंनी बोलायला सुरुवात केल्यावर समोर कितीही कठोर हृदयाचा व्यक्ती असला तरी त्याचं काळीज पाझरल्याशिवाय राहत नव्हतं", असंदेखील अरुण सपकाळ यांनी सांगितलं.
हेही वाचा -