मुंबई 12 MLC Issue : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या (12 MLA) नियुक्तीवरून गेल्या चार वर्षात राज्यात सातत्याने राजकीय संघर्ष सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपालांना यादी देऊनही राज्यपालांनी या आमदारांच्या नियुक्तीची घोषणा केली नाही असा आरोप, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. केवळ राजकीय आकसापोटी विधान परिषदेतील बारा आमदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित राहावं लागलं आहे. या संदर्भात आपण वारंवार राज्यपालांची भेट घेऊन त्यांना विनंती केली. मात्र, त्यांनी आमच्या मागणीला नेहमीच वाटाण्याच्या अक्षता लावल्या असं पटोले यांनी सांगितलं.
बारा आमदारांची नियुक्ती लवकरच: यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, महायुतीच्या वतीनं राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्ता लवकरच होतील. या संदर्भात काही लोकांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळं याबाबत तातडीने कार्यवाही करता आली नाही. मात्र लवकरच या 12 आमदारांच्या नियुक्त्या होतील.
एकावेळेस निवृत्त होण्यामागे काय आहे गणित : विधान परिषदेच्या दर दोन वर्षांनी रिक्त होणाऱ्या जागांबाबत कोणाची वर्णी लावावी यावरून काँग्रेस सत्तेत असतानाच अंतर्गत राजकारणाला सुरुवात झाली होती. त्यामुळं 1984 मध्ये रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या चार जागा भरल्या गेल्या नाहीत. 1986 मध्ये आणखी एक आमदार निवृत्त झाले आणि या जागांची संख्या पाच झाली. 1986 मध्ये आणखी तीन आमदार निवृत्त झाले आणि या रिक्त जागांची संख्या आठ झाली. 1987 मध्ये आणखी एक आमदार निवृत्त झाल्याने रिक्त जागांची संख्या नऊ वर पोहोचली. तर 1988 मध्ये आणखी तीन आमदार निवृत्त झाल्यामुळं विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांची संख्या 12 वर पोहोचली.