पालघर Hitendra Thakur Press Conference : पालघर लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नेत्यांच्या सभेत आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पालघर लोकसभेचा प्रचार सुरु असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेलाच पत्रकार परिषद घेत हितेंद्र ठाकूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
काय म्हणाले हितेंद्र ठाकूर? : पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'हितेंद्र ठाकूर हे बेडकाचा फुगलेला बैल असून वसईत त्यांना निपटून टाकू', असं म्हटलं होतं. यावर बोलताना हितेंद्र ठाकूर म्हणाले की, "कुणाच्या बापाची हिंमत आहे, आम्हाला निपटून टाकण्याची? त्यांनाच पालघर जिल्ह्यातून निपटून टाकतो. खरंतर लोकसभा निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करायला हवा. चांगली भाषा वापरायला हवी. परंतु हे काय बैल, बेडूक, मेंढरं असे शब्द वापरतात. ते मला बैल म्हणाले, पण मी तर बैलासारखा दिसत नाही. तसंच जे माझ्याबद्दल बोलले, त्यांनी अगोदर ते स्वत: कसे दिसतात, याचं अवलोकन करावं", असा टोला ठाकूर यांनी लगावला.
कोट्यवधी रुपये वसुलीचा धंदा :पुढं ते म्हणाले की, "पालघर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, तलाठी, अंगणवाडी सेविका, ठेकेदार तसंच अन्य सर्व सरकारी कर्मचारी भाजपाच्या प्रचाराला जुंपलेत. अंगणवाडी सेविकांच्या मेळाव्यात भाजपाचं चिन्ह लावल्यामुळं अंगणवाडी सेविकेची नोकरी जाता जाता वाचली. पालघर जिल्ह्याचं वाटोळं झालं तरी चालेल, येथे रस्ते, वीज, पाणी वा अन्य कोणतेही प्रश्न सुटले नाहीत तरी चालतील. परंतु निवडणुकीसाठी कोट्यवधी रुपये जमा करण्यावर पालकमंत्र्यांचा भर आहे." तसंच ठेकेदार अधिकाऱ्यांकडून वीस-वीस कोटी रुपये मागितले जात असल्याला गंभीर आरोपही यावेळी ठाकूर यांनी केला.