गडचिरोली Gadchiroli-Chimur Lok Sabha Constituency : गडचिरोली हा आदिवासी, मागासलेला तसंच घनदाट जंगलाने व्यापलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा अतिशय दुर्गम, डोंगर दऱ्यांनी व्यापलेला अविकसित भाग आहे. 26 ऑगस्ट 1982 ला गडचिरोली हा भाग चंद्रपूरमधून वेगळा झाला आणि गडचिरोलीला एक स्वतंत्र जिल्हा म्हणून मान्यता मिळाली. त्यानंतरही काही दिवस मतदार संघ म्हणून गडचिरोलीचा चंद्रपूरमध्येच समावेश होता. मात्र 2009 साली जेव्हा मतदार संघांची पुनर्रचना झाली, तेव्हा गडचिरोली-चिमुर हा स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. विशेष म्हणजे हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव करण्यात आलाय. त्यामुळं इथं नेहमीच जातीय समिकरणांच्या आधारेच मतदान होत आलय. याच मतदार संघात भाजपाचे अशोक नेते हे सध्या विद्यमान खासदार असून, पुन्हा एकदा भावी खासदारकीसाठी त्यांनी आपलं नशीब पणाला लावलंय. तर अशोक नेतेंना सत्तेच्या खुर्चीवरुन उतरवण्यासाठी कॉंग्रेसनं डॉ. नामदेव किरसान यांना रिंगणात उतरवलंय.
भाजपा आणि कॉंग्रेसमध्ये थेट लढत : क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ असलेल्या गडचिरोली-चिमूर मतदारसंघात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढत होणार आहे. या मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होणार असल्यानं इथल्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. मात्र तरीदेखील कुणाचं पारडं जड असेल याचा अंदाज वर्तवणं कठीण झाल्यानं इथं चुरशीची लढत असल्याचं चित्र दिसतंय. भाजपाकडून विद्यमान खासदार अशोक नेते तिसऱ्यांदा विजयी होणार असा दावा करत असले तरी सत्ताविरोधी वातावरणामुळं आम्हीच जिंकणार असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान व्यक्त करत आहेत. गडचिरोली-चिमूर मतदारसंघात एकूण 10 उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंघातील सहा विधानसभेतील एकंदरीत वातावरण बघता महायुतीचे अशोक नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्यातच थेट लढत होणार असल्याचं चित्र आहे.
अशोक नेते हॅट्रिक करणार का : भाजपाचे अशोक नेते हे तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मागील दोनवेळा मोदी लाटेत निवडून आलेले नेते यांना या वेळी तिकिटासाठी शेवटपर्यंत वाट पाहावी लागली. यंदा त्यांना सत्ताविरोधी वातावरणाचा फटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. कार्यकर्त्यांना अनेक ठिकाणी रोषाचा सामना करावा लागत आहे. तर रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, अंतर्गत रस्ते यासह विविध विकासकामं, पक्षसंघटन आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह प्रचारासाठी उतरलेली नेत्यांची फळी ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
विकासापासून मतदारसंघ वंचित :भरपूर वनक्षेत्र असल्यानं इथं नद्या-नाले भरपूर असून पाण्याची कमतरता नाही. पण ज्या पद्धतीनं इथं वॉटर ग्रिड योजना राबवल्या गेल्या पाहिजेत, सिंचनाची सोय केली पाहिजे. ती इथं झालेली नाही. तसंच हा जिल्हा तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात वसलेला आहे. पण रोजगारासाठी दुसऱ्या राज्यांशी इथला संपर्कच तयार करण्यात आलेला नाही. यामुळं आधीच आदिवासी भाग असल्यामुळं इथं शिक्षणाची वानवा तर आहेच; मात्र बेरोजगारीची तर लाटच आहे. म्हणूनच गडचिरोली-चिमुर मतदार संघाला एका वेगळ्या पातळीवर जाऊन काम करण्याची गरज आहे.