पुणे Former BJP MLA Campaign Tutari : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. पुण्यात भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं जोराचा धक्का दिलाय. आगामी निवडणुकीत 'तुतारी'च आपलं चिन्ह असल्याचं भाजपाच्या माजी आमदारानं जाहीर करत प्रचाराला सुरुवात देखील केली. याआधी शरद पवारांनी कोल्हापुरात भाजपाला धक्का दिला होता. आता पुण्यात भाजपाला दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे.
पुण्यात भाजपाला धक्का : पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे हे सध्या भाजपामध्ये आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते 'तुतारी' हातात घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, शनिवारी सर्वत्र गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंडळांना भेट देत असताना वेगळंच चित्र पाहायला मिळालं. आगामी विधानसभेसाठी आपण 'तुतारी' हाती घेणार असून, तुतारीला मतदान करण्याचं आवाहन बापूसाहेब पठारे यांनी मंडळांना केलं. कार्यकर्त्यांना आवाहन करतानाचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आलाय. 'तुतारी'वर लढणार असल्याचं यात ते जाहीर करताना दिसत आहेत.