मुंबई Lok Sabha Election : आज मुंबईत मतदान पार पडतंय. यात महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा असल्यानं मुंबईत नेमका लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो, याकडं सर्वांचं लक्ष आहे. सकाळी सात वाजल्यापासून दादरवासीयांचा मतदान करण्याकडं कौल दिसतोय. दादरवासी सकाळपासूनच आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरातून बाहेर पडत आहेत. यात काही ज्येष्ठ तर काही फर्स्ट टाइम वोटर देखील आहेत. इथं शिरवडेकर कुटुंबीयांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या कुटुंबात शर्मिला शिरवडेकर या 80 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक असून त्या यापूर्वी पालिकेत कर्मचारी होत्या. त्यांनी या आधी निवडणूक कर्मचारी म्हणून देखील काम केलंय. 'ईटीव्ही भारत'शी बोलताना आपला अनुभव सांगितला.
मतदान करण्याचं आवाहन : शिरवडेकर कुटुंबीयांनी आम्ही देशाचा विकास डोळ्यासमोर ठेवून मतदान केल्याचं सांगितलं. यात शिरवडेकर कुटुंबीयांचा पहिल्यांदाच मतदान करणारा सदस्य देखील होता. त्यानं देखील लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन केलंय. तर, शिरवडेकर कुटुंबियातील ज्येष्ठ नागरिकांनी आम्हाला मतदान केंद्रावर चांगली वागणूक मिळाली. शांततेत आणि उत्तमरित्या मतदान पार पडलं, अशी प्रतिक्रिया दिली. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीय. या लोकसभा मतदारसंघातील बालमोहन विद्यामंदिर या मतदान केंद्रावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ भजन गायक अनुप जलोटा, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर असे सेलिब्रेटी मतदान करणार आहेत. मुंबईतील उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता दादरकर सकाळी लवकर मतदान करण्यास प्राधान्य देत असल्याचं दिसून येत आहे.