महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

एकनाथ खडसे करणार 'घरवापसी', खडसेंच्या स्वगृही परतण्याबाबत काय म्हणाले सत्ताधारी-विरोधक? - Eknath Khadse - EKNATH KHADSE

Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे स्वगृही म्हणजे भाजपात परतणार असल्याची चर्चा आहे. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Eknath Khadse
एकनाथ खडसे करणार 'घरवापसी'?, खडसेंच्या स्वगृही परतण्याबाबत काय म्हणाले सत्ताधारी-विरोधक?

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 7, 2024, 1:44 PM IST

Updated : Apr 7, 2024, 2:26 PM IST

मुंबई Eknath Khadse : लोकसभा निवडणुकीत आयाराम-गयाराम यांना ऊत आल्याचं सध्या चित्र दिसतंय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे स्वगृही म्हणजे भाजपात परतणार असल्याची चर्चा आहे. खडसेंनी दोनच दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली. भाजपात असताना पक्षांतर्गत कलह आणि देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्याबरोबर झालेल्या मतभेदानंतर त्यांनी वेगळी भूमिका घेत राष्ट्रवादी प्रवेश केला होता. मात्र आता खडसे भाजपात प्रवेश करणार आहेत. खडसेंच्या प्रवेशावर नेमकं सत्ताधारी भाजप पक्षातील नेते आणि विरोधकांनी काय म्हटलंय? तसंच भाजपा नेत्यांचा विरोध मावळला आहे का?


खडसेंचा भाजपा प्रवेश ठरला? : एकनाथ खडसेंनी भाजपात 40 वर्ष काम केलं. याकाळात त्यांनी विविध पदांवर काम केलं. 2014 साली फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी महसूल मंत्री म्हणूनही कार्यभार सांभाळला. एकनाथ खडसे हे तेव्हा मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार समजले जात होते, मात्र त्यांना डावलून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. याचवेळी एकनाथ खडसेंनी नाराजी व्यक्त केली होती. खडसे एवढे अनुभवी असूनही त्यांना दोन नंबरचं पद दिल्यामुळं खडसेंवर अन्याय झाला असं बोललं गेलं. याच काळात त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी मतभेद झाले. आपल्याला मानसन्मान आणि योग्य ती वागणूक मिळत नसल्याचा आरोप खडसेंनी पक्षावर केला. याचवेळी खडसेंना जमीन घोटाळा प्रकरणात महसूल मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर भाजपा पक्षातील अंतर्गत कलह खडसेंनी चव्हाट्यावर आणला होता. देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर खडसेंनी गंभीर आरोप केले होते. कालांतरानं त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मुख्य राजकारणापासून मागील चार ते पाच वर्ष खडसे बाजूला होते. परंतु, आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे स्वगृही परतणार आहेत. भाजपा नेत्यांच्या वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यासोबत असलेले त्यांचे मतभेदही मावळल्याचं दिसून येतंय.

खडसेंची राज्यपाल पदावर वर्णी : एकनाथ खडसेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जेपी नड्डांची दिल्लीत भेट घेतली आहे. या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 9 तारखेला नवी दिल्ली इथं अमित शाह आणि जेपी नडांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंच्या प्रवेश होणार असल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे एकनाथ खडसेंनी भाजपा प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यातील राज्यपाल पद देण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय. कारण एकनाथ खडसे यांचा राजकीय अनुभव मोठा आहे. त्या अनुभवाचा राज्यपाल या पदाला फायदा होऊ शकतो, असं म्हटलं जातंय.

देवेंद्र फडणवीसांचा त्यांना कधीच विरोध नव्हता : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, " एकनाथ खडसे जर भाजपामध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे. मोदींच्या विकास कामांना साथ देण्यासाठी विकसित भारतासाठी जर कोणी आमच्या पक्षात येत असेल तर त्याचं आम्ही स्वागतच करू. अन्य पक्षातून कोणीही आमच्या पक्षात आलं तर आम्ही त्याला नाही म्हणणार नाही. एकनाथ खडसे हे भाजपामध्ये असताना त्यांना अनेक महत्त्वाची पदं मिळाली मानसन्मान मिळाला. आता ते स्वगृही परत येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. एकनाथ खडसे भाजपामध्ये असताना त्यांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे चांगले संबंध होते. फडणवीस सरकारच्या काळात ते महसूल मंत्री होते. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा नेहमीच आदर केला आहे. दोघांचे चांगले संबंध आहेत. एकनाथ खडसेंनीही फडणवीसांना चांगलं सहकार्य केलंय. त्यामुळं एकनाथ खडसे जर भाजपात येत असतील तर त्याला देवेंद्र यांचा विरोध असण्याचं काहीच कारण नाही. खडसेंच्या प्रवेशावर भाजपा समिती विचार करेल. " असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय.

खडसेंचा भाजपामध्ये छळ :काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, " एकनाथ खडसे हे स्वाभिमानी नेते आहेत. ते भाजपामध्ये जातील असं मला वाटत नाही. कारण खडसे भाजपामध्ये असताना त्यांना मानसन्मान मिळाला नाही. त्यांचा छळ झाला आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. ज्येष्ठ नेते असूनही त्यांना मनासारखा मानसन्मान मिळाला नाही. त्यांच्यावर अन्याय झाल्यानं त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. आता पुन्हा ते भाजपामध्ये घरवापसी करतील, असं मला वाटत नसल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलंय.


भाजपाची वेगळी वॉशिंग मशीन आहे का : खडसे हे भाजपात घरवापसी करणार आहेत, असा प्रश्न शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना विचारला. यावेळी खासदार राऊत म्हणाले, " खडसेंची नेमकी भूमिका मला माहित नाही. ते जाणार की नाही याबाबतदेखील मला माहित नाही. परंतु जर त्यांनी भाजपात प्रवेश केला तर भाजपानं एकनाथ खडसेंवर जे गंभीर आरोप केले होते, त्याचं काय झालं? एकनाथ खडसेंसाठी काय वेगळी वॉशिंग मशीन भाजपानं आणलीय का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. एकनाथ खडसे हे तुमचेच होते. गेली 40 वर्ष खडसे हे भाजपात होते. पक्षातील अंतर्गत मतभेदनंतर त्यांनी वेगळी भूमिका घेतली. पण एकनाथ खडसेंनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. मग त्या आरोपांचं काय झालं?" असा प्रश्न ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते राऊत यांनी उपस्थित केला.

हेही वाचा :

  1. एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार, देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी काय म्हणाले? - eknath khadse to Join BJP
  2. भिवंडीत महायुतीत फूट? शिवसेनेचं खच्चीकरण करणारे भाजपाचे उमेदवार नको! - Bhiwandi Lok Sabha Constituency
Last Updated : Apr 7, 2024, 2:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details