कोल्हापूर -मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतलेल्या महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्यास त्यांचे फोटो काढा. आम्ही त्यांचा बंदोबस्त करतो, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केलं. त्यांच्या या विधानावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली. चौफेर टीका झाल्यानंतर खासदार महाडिक यांनी महिलांची माफी मागितली आहे.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत खासदार धनंजय महाडिक यांची जीभ घसरली. "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढा. आम्ही त्यांचा बंदोबस्त करतो," असं त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. खासदार महाडिक म्हणाले, " पैसे आमच्याकडून घेता. गुणगान त्यांचं गाता हे चालणार नाही." खासदार धनंजय महाडिक हे लाडकी बहीण योजनेवरून केलेल्या विधानानं वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
लाडक्या बहिणींना दम?महायुती सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' महिलांसाठी किती फायदेशीर ठरली, याची मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीतील सत्ताधारी लाडक्या बहीण योजनेचे जोरदार ब्रँडिंग करत आहेत. तर विरोधकांकडून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अशा स्थितीत राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी भर प्रचार सभेत या योजनेवरून लाडक्या बहिणींना दम भरला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीत खासदार महाडिक यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महायुतीची कोंडी होणार आहे.
टीकेनंतर मागितली माफी-खासदार महाडिक यांनी एक्स सोशल मीडियावर पोस्ट करत महिलांची माफी मागितली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, " कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर त्यांची बिनशर्त माफी मागतो. वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी नव्हते. राजकीय प्रचार करताना विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारमुळेच यशस्वी झाल्याचे ठामपणे सांगितले. 'व्होट जिहाद' करणाऱ्या महिलांबाबत स्वाभाविक प्रतिक्रिया होती," असे महाडिक यांनी म्हटलं आहे. "राजकीय आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान केला आहे. भगीरथी महिला संस्थेमार्फत महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी चांगले काम करत आलो आहे," असा त्यांनी दावादेखील केला.