मुंबई Amruta Fadnavis on Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अभ्यासू, हुशार आणि राजकारणातील मुरब्बी नेते मानले जातात. देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. मात्र याशिवाय ते खूप छान कवी आणि गीतकार सुद्धा आहेत. त्यांचा हा लपून राहिलेला पैलू लवकरच श्रोत्यांच्या भेटीला येत आहे, अशी माहिती त्यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी दिलीय.
देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास : देवेंद्र फडणवीस हे अत्यंत व्यासंगी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांनी कायद्यातील पदवी संपादन केली आहे. तर उद्योग व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. शिवाय बर्लिन मधल्या डीएसई संस्थेमधून प्रकल्प व्यवस्थापन या विषयातही पदविका प्राप्त केली आहे. त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विषयातील कामाबद्दल जपानच्या विद्यापीठानं त्यांना नुकतीच मानद डॉक्टरेटही प्रदान केलीय. अत्यंत कमी वयात राजकीय कारकिर्दीला सुरुवात करून भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण महापौर ते महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री इथपर्यंतचा प्रवास त्यांनी केलाय. मात्र ते कुटुंबासाठीही तितकाच वेळ देतात, असं अमृता फडणवीस सांगतात.
कवी देवेंद्र फडणवीस: देवेंद्र फडणवीस हे लहानपणापासूनच उत्तम कविता करतात. उत्तम गीत रचना करतात. त्यांनी इयत्ता पाचवीमध्ये असताना त्यांच्या गीतांचं पुस्तक केलं होतं. त्यांच्या आई याबद्दल खूप आठवणी सांगतात. ते उत्तम गीतकार आहेत, त्यांनी लिहिलेल्या कवितांची आणि गीतांची वही मी शोधत आहे. ती मिळाली तर नक्कीच मी प्रकाशित करणार आहे, असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.