पुणे :राज्यात गाजलेल्या 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जयंत पाटील यांनी अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याची फाईल दाखवून फडणवीस ब्लॅकमेल करत होते, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील मस्करी करतात :देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर असून नाराज इच्छुकांच्या गाठीभेटी तसंच विविध पदाधिकाऱ्यांच्या घरी देखील भेट देत असून नाराजी दूर करत आहेत. यावेळी त्यांना जयंत पाटील यांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. "जयंत पाटील यांचा चेहरा बघा ते नेहमीच मस्करी करत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असतं. त्यांना गांभीर्यानं घेऊ नका," अशी टोलेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केली.
अजित पवारांचे उमेदवार अर्ज मागे घेतील : देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्याबाबत म्हणाले, "निवडणुकीच्या निमित्तानं काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यासाठी मी पुण्यात आलोय. तसंच येथे इतर जिल्ह्यातील लोक देखील पुण्यात भेटायला येत आहेत." पुणे जिल्ह्यातील अनेक जागांवर भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार असताना देखील अजित पवारांनी उमेदवार उभे केले आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले, "मला अपेक्षा आहे की, अजित पवार यांच्या उमेदवारांनी भरलेले अर्ज ते मागे घेतील, आमच्यात कोणीही नाराज होणार नाही."