नंदुरबार : जिल्ह्यातल्या अर्ज माघारीनंतर लढतीचं चित्र स्पष्ट झालंय. सर्वात कमी उमेदवार हे शहादा मतदारसंघात असणार असून सर्वाधिक उमेदवार हे नवापूर मतदारसंघात असणार आहेत. जिल्ह्यात चार विधानसभा क्षेत्रात 31 उमेदवार रिंगणात असणार असून 32 उमेदवारांनी माघार घेतली आहे. शहाद्यात तीन उमेदवार शिल्लक राहीले असून नवापूरात 12 उमेदवार रिंगणात असणार आहेत.
कोणी घेतला उमेदवारी अर्ज माघारी : काँग्रेस पक्षाच्यावतीनं शहादा आणि नंदुरबार विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करण्यात आली होती. शहादा मतदारसंघातून विद्यमान जि.प. उपाध्यक्ष सुहास नाईक आणि नंदुरबारमधून तालुकाध्यक्ष विश्वनाथ वळवी यांनी बंडखोरी केली होती. त्यांची समजूत काढून त्यांना पक्षाचे काम करण्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांची मनधरणी केली. तर शिंदे पक्षातर्फे अक्कलकुवा मतदारसंघात विजय पराडके यांनी आपला अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला होता. तो माघार घेण्यासाठी संपर्कप्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांची मन धरणी केली. त्यानंतर त्यांनी देखील अर्ज माघारी घेतली. मात्र भाजपा तर्फे माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी बंडखोरी करत अक्कलकुवा मतदारसंघात आपला अपक्ष उमेदवार अर्ज माघार न घेता निवडणूक लढविण्याबाबत स्पष्ट केलं आहे.
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे चित्र : नंदुरबार जिल्ह्यात अर्ज माघारीनंतर आता सर्व लढतीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा मतदारसंघात 33 इच्छुकांनी नामांकण अर्ज दाखल केले होते. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात एकूण 17 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 10 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 7 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. शहादा विधानसभा मतदारसंघात एकूण 21 नामांकण दाखल झाले होते. त्यापैकी 12 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. आज तब्बल 9 उमेदवारांनी अर्ज माघारा घेतला असून आता 3 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. नंदुरबार विधानसभा क्षेत्रात 27 इच्छुकांनी नामांकण दाखल केले होते. छाणणी अंती विधानसभा 13 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी चौघांनी अर्ज माघारी घेतला असून आता 9 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तर सर्वाधिक उमेदवार हे नवापूर मतदारसंघात असणार आहे. याठिकाणी 38 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विधानसभा मतदारसंघात एकूण 21 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 9 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 12 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे.
बंडखोरांच्या मन धरणी : जिल्ह्यात काँग्रेस पक्षात दोन मतदारसंघात बंडखोरी करण्यात आली होती. काँग्रेस पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या बंडखोरीला रोखण्यासाठी पक्ष श्रेष्ठींकडून प्रयत्न करण्यात येत होते. आज सुहास नाईक यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर लगेचच सुहास नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेण्याची घोषणा केली. त्यामुळं काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित यांना मोठा फायदा होणार आहे. तर नंदुरबार विधानसभा मतदारसंघात तालुकाध्यक्ष विश्वनाथ वळवी यांची देखील मनधरणी करण्यात त्यांना यश आलं. त्यांनी देखील नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला. त्यामुळं काँग्रेसमधील बंडखोरी रोखण्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना यश आलं आहे.
शिवसेनेतील बंडखोर विजय पराडके यांची माघार : अक्कलकुवा मतदारसंघात शिवसेनेतर्फे विद्यमान विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांना पक्षातर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच शिवसेनेतर्फे विजय पराडके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्याचबरोबर अपक्ष अर्ज देखील त्यांनी दाखल केला होता. छाणणी अंती विजय पराडके यांच्या शिवसेनेचा उमेदवारी अर्ज बाद झाला मात्र, अपक्ष अर्ज कायम होता. नंदुरबार, धुळे शिवसेना संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विजय पराडके यांची मनधरणी केली आणि त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला.
महायुतीत बंडखोरी कायम : अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात महायुतीतर्फे शिंदे गटाला जागा सोडण्यात आली होती. त्यामुळं ही जागा विद्यमान विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्यात आली. मात्र, भाजपा प्रवक्त्या तथा माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी अपक्ष उमेदवारी करून बंडखोरी कायम ठेवली आहे.
डॉ. हिना गावित यांचा भाजपाचा पदाचा राजीनामा : नंदुरबार विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. विजयकुमार गावित हे आहेत. असं असताना शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा नेते महायुतीमध्ये सक्रिय न राहता उघडपणे विरोधी पक्षाच्या उमेदवाराला बळ देत आहेत. भाजपाच्या विरोधातील त्यांच्या या भूमिकेविषयी यापूर्वी देखील पक्षाच्या वरिष्ठांना सांगून झाले असून आज माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रतीक्षा केली. तथापि या परिस्थितीमध्ये बदल घडला नाही. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी गद्दारीची भूमिका सोडलेली नाही. म्हणून अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून मी दाखल केलेली माझी उमेदवारी कायम ठेवली. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवण्यासाठी तसेच आमचे हक्क अबाधित राखण्यासाठी पुढची लढाई लढणार आहे. माझ्या या भूमिकेला स्थानिक जनतेचा या गोष्टीला भरभरून पाठिंबा आणि प्रतिसाद आहे. महायुतीमधील आणि पक्षातील शिस्तीचा भाग म्हणून तसेच राजकीय संकेत पाळून मी भाजपाच्या पदांचा राजीनामा पाठवत आहे असं डॉ. हिना गावित यांनी सांगितलं.
हेही वाचा -