कोल्हापूर : काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्या घमेंडी स्वभावामुळं काँग्रेसला उतरती कळा लागली. स्वतःच्या सत्तेसाठी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा वापर करायचा आणि त्यांना असं अर्वाच्य भाषेमध्ये बोलायचं, हे कोल्हापूरकर सहन करणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ होईल, असा घणाघात राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. कोल्हापुरात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
छत्रपती घराण्याचा अवमान : "कोल्हापूरच्या राजघराण्यातील सदस्य मधुरिमाराजे छत्रपती यांचं उमेदवारी जाहीर झालेलं पत्र आलं. वाजत गाजत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीची पहिली पसंती राजू लाटकर होती आणि दुसरी पसंती मधुरिमाराजे छत्रपती होते. म्हणजे हा छत्रपती घराण्याचा अवमान आहे. लाटकर यांची उमेदवारी मागे घेण्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. खासदार शाहू महाराज, मधुरिमाराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती यांनी जाऊन उमेदवारी मागे घेतली. हे काँग्रेसच्या संपूर्ण इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल," असं धनंजय महाडिक यावेळी बोलताना म्हणाले.
सतेज पाटलांच्यामुळं ही परिस्थिती : "उमेदवारी मागं घेऊन कार्यालयातून बाहेर येत असतानाचे व्हिडिओ हे मन हेलावून टाकणारे होते. सतेज पाटील यांच्या स्वभावामुळं ही परिस्थिती आली. मी म्हणेण तोच कायदा, मी या कोल्हापूरचा मालक, काँग्रेसचे सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते माझे नोकर आहेत. हा त्यांचा अविर्भाव होता," अशी घणाघाती टीका महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर केली.
उमेदवारी बदलली त्याच दिवशी नाक कापलं गेलं : "सामान्य कार्यकर्त्याला मिळालेली उमेदवारी बदलली त्यादिवशी त्यांचं नाक कापलं गेलं. आज सुद्धा माघार घेतल्यानं काँग्रेस पक्षाची मोठी नाचक्की झाली आहे. कोल्हापूर उत्तर हा आमचा बालेकिल्ला आहे. मात्र, यावेळी त्यांच्या पक्षाचं हात चिन्हच त्यांच्याकडे नाहीये मग प्रेशर कुकरवर मतदान करायच का?", असा सवाल महाडिक यांनी उपस्थित केला. "काँग्रेसनं पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल आणि राजेश क्षिरसागर आजपर्यंतच्या इतिहासाच्या विक्रमी मतांनी निवडून येतील," असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला. त्यांच्या आघाडीमध्ये मशाल, तुतारी आणि हात हे चिन्ह आहे. मात्र याशिवाय आता प्रेशर कुकर देखील महाविकास आघाडीचं नवीन चिन्ह झालेलं आहे.
कोल्हापुरातून उद्या फुटणार महायुतीच्या प्रचाराचा नारळ : उद्या महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ होत आहे.
खासदार शाहू महाराजांच्या राजीनाम्याची सोशल मीडियावर चर्चा : उमेदवारी माघार घेण्याच्या अखेरच्या क्षणी घडलेल्या या घटनेनं व्यतीत झालेले काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती आपल्या खासदार पदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. "ज्या पद्धतीनं शाहू महाराजांचा अवमान झाला आहे तो कोणीही सहन करणार नाही. आजपर्यंत राजघराण्यावर अशा पद्धतीची भाषा आणि वक्तव्य करण्याचं धाडस कोणीही केलं नाही. सतेज पाटील स्वतःला सर्वोच्च समजत आहेत," असा घणाघात महाडिक यांनी केलाय.
हेही वाचा