मुंबई-भाजपा विधिमंडळ पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार हे उपमुख्यमंत्रपिदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर सायंकाळी होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
Live Updates-
- एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स संपला
- एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार
- थोड्याच वेळात एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदाबाबतचे पत्र राज्यपालांना देणार
- एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत
- उपमुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे हे शपथ घेतील असं मला वाटतं. गिरीश महाजन यांची माहिती
- गिरीश महाजन यांनी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांची घेतली भेट
- शपथविधी सोहळ्याला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार नाहीत
- शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले, "एकनाथ शिंदे आमची विनंती ऐकतील. ते उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, आमचा विश्वास आहे. ते आमचे नेते आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी, अशी आमची इच्छा आहे. आम्ही सर्व एकनाथ शिंदे यांच्याकडे जात आहोत. आम्ही शपथविधीसाठी त्यांचे मन वळवणार आहोत."
- शिवसेना नेते दीपक केसरकर म्हणाले "शिवसेनेच्या सर्व आमदारांनी काल संध्याकाळी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी आणि उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची विनंती केली. आपण यावर सकारात्मक विचार करू, असं ते म्हणाले. एकनाथ शिंदे हे नेहमी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे म्हणणे ऐकून घेतात. भाजपाची आणि आमची तत्वे, विचारधारा एकच आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनापूर्वी झाला पाहिजे."
- देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे मुंबईत आगमन झालं. त्यांनी शपथविधी सोहळ्यापूर्वी म्हटलं की, "आमच्या कार्यकर्त्यांसाठी तसेच महाराष्ट्रातील जनतेसाठी हा मोठा दिवस आहे. कारण राज्यात महायुतीचे सरकार आलं आहे. देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे लोकांमध्ये आणि कामगारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मीदेखील गेल्या 4-5दिवसांपासून खूप उत्साहात आहे."
- देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल माध्यमांशी बोलताना म्हणाले,"मुंबईत होणाऱ्या शपथविधी सोहळ्याबद्दल खूप उत्साही आहे. माझा धाकटा भाऊ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची आम्ही वाट पाहत आहोत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सामील होणार असल्याचा आनंद आहे."
- देवेंद्र फडणवीस शपथविधी सोहळ्यापूर्वी श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेणार आहेत.
शिवसेनेने लावलेले बॅनर चर्चेत-शपथविधीसाठी येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे अनेक बॅनर शिवसेनेतर्फे मेट्रो सिनेमा परिसरात लावण्यात आले आहेत. शपथविधीसाठी येणारे मान्यवर याच मार्गावरून प्रवास करणार असल्याने या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ठळक फोटो आहेत. शिंदे महायुती सरकारमध्ये सहभागी होणार का? त्यांना कुठलं मंत्रिपद मिळणार, याबाबत चर्चा रंगली असताना शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर लावून केलेले स्वागत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत.